उस्मानाबाद / प्रतिनिधी-

इमारत बांधकाम कामगारांच्या विविध मागण्या येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात २०१८ पासून प्रलंबित आहेत. यामध्ये नोंदणी, नूतनीकरणाची प्रकरणे व विविध योजनांचे अर्ज निकाली काढण्यास चालढकल केली जात आहे. त्यामुळे या कामगारांची प्रलंबित असलेली प्रकरणे तातडीने मार्गी लावून त्यांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी स्वतंत्र मजुर जनरल बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने एका निवेदनाद्वारे सरकारी कामगार अधिकाऱ्यांकडे दि.२४ ऑगस्ट रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, येथील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या  कार्यालयाकडे जानेवारी २०२१ पासून नोंदणी व नूतनीकरण अर्ज व २०१८ पासून विविध योजनांचे अर्ज प्रलंबित आहेत. या संदर्भात संघटनेमार्फत वारंवार चर्चा व निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. परंतू संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्यामुळे ती प्रकरणे धूळ खात पडल्यामुळे तशीच प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे कार्यालयातील संबंधित अधिकारी नूतनीकरण व नोंदणीकरण केलेल्या अर्जाचा प्रस्ताव नकारात्मक भावनेने तपासणी करून अर्ज कसा नामंजूर करता येईल याकडे विशेष लक्ष देतात. तर अर्जातील त्रुटी काढताना पाच ते सहा वेळेस त्रुटी काढली जाते. एक त्रुटी पूर्ण केली की लगेच दुसरी नवीन त्रुटी टाकली जाते. त्यामुळे कामगारांचा वेळ आणि पैसा वाया जातो. तसेच सहाय्यक आवश्यक असलेली कागदपत्रे स्पष्ट असताना सुद्धा अस्पष्ट असा शेरा दिला जातो. तर ज्या कागदपत्रांची आवश्यकताच नाही अशी कागदपत्रे मागितली जातात.  

तसेच नोंदणी नूतनीकरणाचे अर्ज निकाली काढताना येथील अधिकाऱ्यांचे एकमत होत  नसल्यामुळे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या म्हणीचा प्रत्यय येत असून प्रत्येक अधिकारी वेगवेगळ्या कागदपत्रांची मागणी करीत असल्यामुळे कामगारांची कामे खोळंबली असल्याचा गंभीर आरोप देखील करण्यात आला आहे. 

तर सुरक्षा संच व अत्यावश्यक संच आणि आरोग्य तपासणी होऊन एक वर्ष झाले. मात्र कामगारांना अद्यापपर्यंत संच देखील वाटप करण्यात आलेले नाहीत. कामगारांचे प्रश्न न येत्या १५ दिवसांमध्ये न सोडविल्यास या

कार्यालयासमोर संघटनेच्यावतीने हलगीनाद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद भालेराव, दादा गवळी, एजाज सय्यद व परमेश्वर वाघमारे यांच्या सह्या आहेत.


 
Top