उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्ह्यातील बहुतांश बँका खरीप हंगाम संपत आला तरी शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यासाठी विविध कारणे सांगून टाळाटाळ करत असल्याच्या घटना समोर येत आहेत. पीककर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकेच्या अधिकाऱ्यांना समज देऊन आठ दिवसांत पीककर्ज वाटप करण्यात यावे, अन्यथा बँकेच्या शाखाधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष रामजीवन बोंदर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात म्हटले की, शेतकऱ्याचे नाव शासनाच्या कर्ज माफी यादीत असताना त्या शेतकऱ्यांना बँका पीक कर्ज देण्यास नाकारत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पिक कर्जाचे नवे-जुने करण्यासाठी बँकेत पैसे भरले अशा शेतकऱ्यांना बँका पीककर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. शेतकऱ्याचे नाव शासनाच्या कर्ज माफीत आहे, परंतू शासनाकडून शेतकऱ्याच्या कर्ज माफीची रक्कम बँकेत आली नाही म्हणून त्या शेतकऱ्यांना खात्यावरील आर्थिक व्यवहार करण्याचे बँकेने बंद केले आहे. बँकेच्या निष्काळजीपणामुळे व पाठपुरावा न केल्यामुळे बरेच शेतकरी छोट्याशा कारणामुळे शासनाच्या पीककर्ज माफीपासून वंचित राहीले आहेत.

जिल्ह्यातील प्रत्येक बँक मॅनेजरने दलाल नेमले असून त्या दलालामार्फत शेतकऱ्यांची फाइल बँकेत गेली की पाच ते दहा हजार घेवून पीककर्ज त्या शेतकऱ्यांना तत्काळ दिले जात असल्याचा आरोप करीत बाकी शेतकऱ्यांची फाइल काही तरी त्रुटी सांगून बाजुला ठेवल्या जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे दोषी बँकांच्या मॅनेजरवर कारवाई करून शेतकऱ्यांना आठ दिवसांच्या आत पीक कर्जाचे वाटप करण्याचे आदेश देण्यात यावेत. अन्यथा ८ दिवसानंतर शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक मॅनेजरच्या तोंडाला शेतकरी व शेतकरी संघटनेच्या वतीने काळे फासून बँकेला टाळे ठोकले जातील, असा इशारा बोंदर यांनी निवेदनातून दिला आहे. निवेदनावर चंद्रकांत भराटे, संतोष राठोड, दत्तात्रय पाटील, साहेबराव चव्हाण, दिलीप चव्हाण, नितीन शिंदे यांचीही स्वाक्षरी आहे.


 
Top