उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हयातील शेतकऱ्यांकडून 2021-2022 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके आणि गळीतधान्य अंतर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारीत कृषी औजारे आणि सिंचन सुविधा साधने या बाबींसाठी महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.पीक प्रात्याक्षिके शेतकरी गटामार्फत राबविली जाणार असल्याने पीक प्रात्यक्षिकांसाठी अर्ज करताना संबंधित कृषी सहाय्यकांशी संपर्क करून 10 हे क्षेत्र असणाऱ्या गटांनी नोंदणी करावी.शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी दि.30 ऑगस्ट 2021 ते दि.10 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदत देण्यात येत आहे.विहित मुदतीत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचाच विचार केला जाईल,असे अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

 राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके आणि गळीतधान्य कार्यक्रम पुढील नमूद जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येतो.गहू- सोलापूर, बीड,नागपूर.कडधान्य (हरभरा)-राज्यातील सर्व जिल्हे.भरडधान्य (मका)-नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, सांगली, औरंगाबाद, जालना. पौष्टिक तृणधान्य-नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला ,वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

  गळीतधान्यासाठी- सांगली, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली,वाशिम,चंद्रपूर.या जिल्हयाचा समावेश आहे.तसेच बियाणे वितरणासाठी याच  जिल्ह्यांचा समावेश आहे.यात हरभरा बियाण्यासाठी 10 वर्षा आतील वाणास २५ रुपये प्रती किलो,१० वर्षावरील वाणास १२ रुपये प्रती किलो,संकरीत मका ९५ रुपये प्रती किलो व रब्बी ज्वारी बियाण्यासाठी १० वर्षाआतील वाणास ३० रुपये प्रती किलो, १० वर्षावरीलवाणास १५ रुपये प्रती किलो,करडई बियाण्यासाठी ४० रुपये प्रती किलो,गहू बियाण्यासाठी १० वर्षाआतील वाणास २० रुपये प्रती किलो, १० वर्षावरील वाणास १० रुपये प्रती किलो.एकूण किंमतीच्या 50 टक्के मर्यादेत अनुदान देय आहे.प्रमाणित बियाणे  वितरणासाठी एका शेतकऱ्यांला दोन हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे.

 पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला एक एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. बियाणे,जैविक खते, सुक्ष्ममूलद्रव्ये, भू सुधारके आणि पीक संरक्षण औषधे या निविष्ठांसाठी शेतकऱ्याला एक एकरच्या मर्यादेत एका पीकासाठी संबंधीत पिकांच्या प्रकारानुसार दोन हजार रुपये ते चार हजार रुपये प्रती एकर मर्यादेत DBT तत्त्वावर अनुदान अदा करण्यात येणार आहे.यासाठी कृषी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येत आहे.संपूर्ण पॅकेजचा वापर करणे अनिवार्य आहे.शेतकऱ्यांची निवड ऑनलाईन लॉटरी पध्दतीने होणार आहे,असेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी म्हटले आहे.


 
Top