उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सध्याच्या कठीण काळात व्यापार्‍यांनी धैर्याने काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ‘कैट’ या राष्ट्रीय संघटनेचे राज्य सचिव महेश बरवाई यांनी केले.

उस्मानाबाद येथील औषधी भवन येथे बुधवारी पार पडलेल्या व्यापारी महासंघाच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस खाद्यतेल संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर ठक्कर, महाराष्ट्र कैटचे सहसचिव सचिन निवंगुणे, कैट व जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय मंत्री यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना बरवाई म्हणाले की, ‘कैट’च्या माध्यमातून व्यापार्‍यांच्या समस्या थेट केंद्र सरकारपर्यंत मांडण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्याचे निराकरण लवकर होत आहे. व्यापार्‍यांनी मॉल संस्कृतीला न घाबरता आपली संघटनशक्ती वाढवून त्यांच्याशी स्पर्धा केली तर यश निश्‍चित मिळू शकते.

खाद्यतेल संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी उस्मानाबाद जिल्हा व्यापारी संघाच्या सातत्यपूर्ण व संरचनात्मक कामाबद्दल जिल्ह्यातील सर्व पदाधिकार्‍यांचे कौतूक केले. तसेच जिल्ह्यातील सर्व किरकोळ व ठोक व्यापार्‍यांना उद्यम नोंदणीबाबत मार्गदर्शन करून सर्वच व्यापार्‍यांनी नोंदणी करण्याबाबत आग्रह केला व यामुळे मिळणार्‍या सवलतींबाबतही त्यांनी यावेळी माहिती दिली.

सहसचिव सचिन निवंगुणे यांनी व्यापारी वर्गास नवीन तंत्रज्ञानाचे महत्व पटवून सांगताना, तंत्रज्ञान आत्मसात करून व्यवसायात सुधारणा घडवून आणणे व संघटनशक्तीचेे महत्वही सांगितले. तसेच जिल्हा व्यापारी संघटनेच्या कामाचे कौतूकही केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय मंत्री यांनी केले. जिल्ह्यातील व्यापारी महासंघाच्या संरचनात्मक रचनेची माहिती करून देताना जिल्ह्यातील जवळपास सात हजार व्यापारी संघाशी संलग्न असल्याचे सांगितले. तसेच आतापर्यंतच्या विविध कामांची व व्यापार्‍यांच्या समस्यांची माहिती दिली.

यावेळी व्यापारी महासंघाचे सचिव लक्ष्मीकांत जाधव, उपाध्यक्ष संजय मोदाणी, कोषाध्यक्ष धनंजय जेवळीकर, तसेच सराफ असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष संजय गणेश, प्रकाश खंडेलवाल, कापड असोसिएशनचे मनोज कोचेटा, पवार, सुमीत कोठारी, स्टील सिमेंट असोसिएशनचे नितीन नायर, अमर खडके, किराणा असोसिएशनचे चंद्रकांत गार्डे, अमोल देवगुडे, अशोक शर्मा तसेच शहरातील प्रतिष्ठीत व्यावसायिक आशिष मोदाणी, प्रशांत पाटील, उल्हास गपाट, अमित मोदाणी, राहुल गजधने, हॉटेल संघटनेचे संपत डोके, सुभाष शेट्टी, राजू जानवाडकर व जवळपास २० संघटनांच्या पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय जेवळीकर तर आभार लक्ष्मीकांत जाधव यांनी मानले.


 
Top