उस्मानाबाद जिल्हा पर्यटन आणि संरक्षित स्थळांच्या दृष्टीने वैभवशाली आहे. जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक, पौराणिक वास्तू तसेच संरक्षित स्थळे आहेत. नव्या पिढीला हा इतिहास अवगत व्हावा, यादृष्टीने स्थानिकांच्या मदतीने जागृतीचा भाग म्हणून अशा ठिकाणी माहिती फलक बसविण्याचा निर्णय घेतला आहे.उस्मानाबाद शहरातील वेगवेगळ्या संरक्षित ठिकाणी बसविलेल्या या फलकाचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते रविवारी (दि. १५) अनावरण करण्यात आले.
जिल्ह्याच्या पर्यटन संवर्धन आणि विकासाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन, उस्मानाबादकरां साथीने पुढच्या काळात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. याचाच एक भाग म्हणून उस्मानाबाद शहरातील महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांची माहिती सर्व नागरिकांना व्हावी, या दृष्टीने माहिती फलकाचे स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधून पालकमंत्री शंकरराव गडाख, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील,जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. जिल्हा सत्र न्यायालयाच्यासमोर पहिल्या महायुद्धाचे स्मारक असून, या ठिकाणी मान्यवरांनी मािहती देणाऱ्या फलकाचे अनावरण केले.त्यानंतर धाराशिव लेण्या, ख्वाजा शमशोद्दीन गाझी रहे. यांचा दर्गा व धारासुर मर्दिनी मंदिर येथे माहिती फलक बसवण्यात आले. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या मार्गदर्शनातून व विविध संस्थांच्या पुढाकारातून पुढच्या काळातही अशा ऐतिहासिक स्थळांना उजाळा देण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी अॅड. राज कुलकर्णी, उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख, समर्थ सिटी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे शेखर घोडके, धीरज मोटे, यशश्री क्लासेसचे संचालक रवी निंबाळकर, शरदचंद्र पवार फाऊंडेशनचे सदस्य सूरज मोटे, लेखक व इतिहास अभ्यासक केतन पुरी, रणवीर इंगळे, ज्ञानेश्वर राऊत, अमित साळुंके, अनिकेत पाटील,नुपूर नायगावकर, राहुल गवळी आदी उपस्थित होते.
एेतिहासिक स्थळांची माहिती देणाऱ्या फलकांचे अनावरण पालकमंत्री गडाख यांनी केले. या वेळी खासदार अाेमराजे, अामदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी दिवेगावकर, नगराध्यक्ष मकरंदराजे अादी उपस्थित हाेते.