उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील एका तरुणाला विनाकारण मारहाण केल्याप्रकरणी आनंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश चव्हाण यांच्यासह तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

फरीद शेख (वय २६, रा. समर्थनगर) हा तरुण शहरातील ज्ञानेश्वर मंदिराजवळ असलेल्या एका पान टपरीवर शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास उभा होता. या वेळी पोलिस निरीक्षक सतीश चव्हाण आणि त्यांचा चालक मुक्रम पठाण आले. त्यांनी टपरी चालकास पान-सुपारीची मागणी केली असता त्यास विलंब लागला. तेव्हा चालक पठाण याने टपरी चालकास शिवीगाळ सुरू केली. त्याचा मित्र फरीद शेख याने पठाण यास शिवीगाळ करू नका म्हणून मध्यस्थी केली. मध्यस्थी केल्याच्या कारणावरून फरीद यांना ठाण्यात आणून चव्हाण, मुक्रम पठाण आणि अन्य दोन पोलिसांनी लाथाबुक्क्यांनी आणि बेल्टने डोक्यावर आणि हातापायावर मारहाण केली. फरीद यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांनी दिलेल्या जबाबावरून पोलिस निरीक्षक चव्हाण, हवालदार तथा चालक पठाण व अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 
Top