तुळजापूर / प्रतिनिधी-
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सि. ना. आलुरे गुरुजी (वय 90) यांचे सोमवारी पहाटे  निधन झाले. सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने सहकार, शैक्षणिक क्षेत्रातील आधारवड, एक दीपस्तंभ काळाच्या पडद्याआड गेला असून काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे.

गांधीवादी विचारांचा प्रभाव असलेल्या आलुरे गुरुजी यांनी अणदूर येथे शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा त्यांनी गावागावात पोहचविली. प्रतिसानेगुरुजी अशी त्यांची शैक्षणिक क्षेत्रात ओळख होती. शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव, नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणून काम करताना सहकार क्षेत्रातही राज्य बँकेचे संचालक, तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, लातूरच्या सिद्धेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन, सोलापूरच्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अशी पदे त्यांनी भूषविली. त्याचबरोबर लातूरच्या बसवेश्वर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, राज्य परिवहन महामंडळाचे संचालक, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ सदस्य, तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त म्हणून कार्यरत असताना त्या त्या क्षेत्राला योग्य न्याय देण्याचे काम त्यांनी केले. 

काँग्रेस पक्षाचा एक मार्गदर्शक, शैक्षणिक, सहकार चळवळीचा आधारवड कोसळल्यामुळे या क्षेत्रांची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त सकाळी कळताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला.

 
Top