उस्मानाबाद / प्रतिनिधी-

चारचाकी वाहन चालवण्याचा परवाना काढून देण्यासाठी ७०० रुपयांची लाच घेणाऱ्या खासगी आरटीओ एजंटाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

एका व्यक्तीकडे दुचाकी चालवण्याचा परवाना होता. त्यांना चारचाकी वाहन चालवण्याचा परवाना हवा होता. तो काढून देण्यासाठी तसेच संंगणकीय परीक्षा आणि ड्राइव्हिंग टेस्ट पास करून देण्यासाठी खासगी आरटीओ एजंट व परंडा येथील दिपक ड्रायव्हींग स्कूलचा कर्मचारी महेश बिभीषण थोरबोले याच्याशी त्यांनी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी तीन हजार रुपये लाचेची मागणी करून पहिला हप्ता म्हणून ७०० रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली. याप्रकरणी त्याला ताब्यात घेऊन त्यांचे विरुद्ध परंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गौरीशंकर पाबळे, अंमलदार शिवाजी सर्जे, मधुकर जाधव, विष्णू बेळे, विशाल डोके, अविनाश आचार्य यांनी केली आहे.


 
Top