तुळजापूर/ प्रतिनिधी-

शहरापासून जवळच घाटात रस्त्याच्या कडेला झाडीत लातूर जिल्ह्यातील उजनी येथील आकाश दगडू सोनटक्के (२८) मृतावस्थेत आढळून आले आहेत. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला याचा शोध पोलिस घेत आहेत. मात्र, हा घातपाताचा प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, मृताच्या खिशातील आधार कार्ड वरून त्याची ओळख पटली आहे.

सोलापूर महामार्गालगतच्या झाडीत मंगळवारी (दि. ६) सकाळी शहरातील एका सर्प मित्राला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह निदर्शनास आला. घटनास्थळी मृतदेहाजवळ एक दुचाकी (एमएच २४, बीसी ४१६६) आढळुन आली. प्राथमिक अंदाजानुसार सोनटक्के यांचा मृत्यू दोन-तीन दिवसापूर्वी झाला असल्याचे समजत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक ए. व्ही. काशीद, सहायक पोलीस निरीक्षक सुशीलकुमार चव्हाण, शहर बीट अंमलदार विजय राठोड, पोलिस हवालदार अजित सोनवणे, गणेश पतंगे, वानखेडे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघात की घातपात याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक काशीद करत आहेत.

 
Top