उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 गुजरातमधील बडोद्याच्या मराठी वाङमय परिषदेच्या वतीने दिला जाणारा अखिल भारतीय अभिरुची साहित्य गौरव पुरस्कारकवयित्री भाग्यश्री रवींद्र केसकर यांच्या ‘उन्हानं बांधलं सावलीचं घर’ या कवितासंग्रहाला जाहीर झाला आहे. त्याबद्दल मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीने कवयित्री केसकर यांचा सत्कार करण्यात आला.

बृहन्महाराष्ट्रातील एक महत्वाची साहित्य संस्था असा गुजरातमधील मराठी वाङमय परिषदेचा लौकिक आहे. गतवर्षी मुंबई येथील ग्रंथाली प्रकाशन संस्थेच्या वतीने कवयित्री भाग्यश्री केसकर यांचा ‘उन्हानं बांधलं सावलीचं घर’ हा कवितासंग्रह प्रकाशित करण्यात आला. प्रकाशनपूर्व या कवितासंग्रहाच्या प्रती साहित्यप्रेमी, वाचकांनी नोंदविल्या होत्या व त्या प्रकाशनापूर्वीच संपल्या आहेत. कोरोनाकाळामुळे या कवितासंग्रहाचे प्रकाशन केले नाही. कोरोनाचा संसर्ग ओसरताच दुसर्‍या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा होणार आहे. वर्षभरात या कवितासंग्रहाबद्दल मान्यवर साहित्यिकांनी पुस्तक परिक्षण, समीक्षा लिहून ग्रंथाली प्रकाशन संस्था व केसकर यांना अभिप्राय दिले आहेत. हा कवितासंग्रह अखिल भारतीय स्तरावर सर्वोत्कृष्ट कवितासंग्रह म्हणून बडोदा येथील मराठी वाङमय परिषदेने ‘उन्हानं बांधलं सावलीचं घर’ कवितासंग्रहास अखिल भारतीय अभिरूची गौरव पुरस्कार जाहीर केला आहे. केसकर यांच्या कवितासंग्रहास यापूर्वी महात्मा ज्योतीबा फुले स्मृति साहित्य राज्यस्तरीय पुरस्कार, डॉ. बाबासाहेब अकॅडमीचा राज्यस्तरीय पुरस्कार हे पुरस्कार मिळाले आहेत. यंदा हा तिसरा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीने कवयित्री भाग्यश्री केसकर यांचा अध्यक्ष नितीन तावडे, सचिव माधव इंगळे, कोषाध्यक्ष बालाजी तांबे व कार्यकारी सदस्य राजेंद्र अत्रे यांनी सत्कार करून अभिनंदन केले. 

 
Top