उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 राजुरी (ता. उस्मानाबाद) येथे लोकसहभागातून गावपातळीवर सुरू झालेल्या जिल्ह्यातील पहिल्या अत्याधुनिक कम्युनिटी कोविड आयसोलेशन सेंटरचे उद्घाटन जिल्हा अाराेग्य अधिकारी डाॅ.हनुमंत वडगावे यांच्या हस्ते करण्यात अाले.

जिल्हा परिषदेच्या शाळेत १० बेडचे आयसोलेशन सेंटर तयार करण्यात आले असून, या कार्यक्रमासाठी जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन देशमुख, गटशिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार, पंचायत समिती सदस्य कुसुमताई इंगळे, नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे, स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेच्या नसीम शेख, किरण माने, प्रशांत पाटील, सरपंच मधुकर गळकाटे, पत्रकार महेश पोतदार, उपसरपंच गणेश घोगरे, ग्रामसेवक अश्विनीकुमार पाटील आदी उपस्थित होते.

कम्युनिटी आयोसलेशनन सेंटर तयार करण्यासाठी गावकऱ्यांनी, ग्रामपंचायतीमार्फत लोकसहभागातून यासाठी पुढाकार घेतला आहे. तर स्वयंशिक्षण प्रयोग या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली हे कम्युनिटी आयसोलेशन सेंटर चालवण्यात येणार आहे. भविष्यात येणाऱ्या कोरोनाच्या अापत्तीवर मात करण्यासाठी, गाव पातळीवरच समुपदेशन करण्याच्या उद्देशाने हे सेंटर काम करणार आहे. या सेंटरमार्फत प्राथमिक टप्प्यातील कोविड संसर्ग झालेल्या लोकांची या ठिकाणी काळजी घेतली जाणार आहे. होम आयसोलेशनचा सल्ला दिलेल्या रुग्णांना येथे अॅडमीट करून घेण्यात येणार आहे. तसेच कोविड संसर्ग रोखण्यासाठीची प्रतिबंधात्मक उपाययोजना, माहिती, लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी समुपदेशन, लसीकरण संबंधित माहिती आणि लसीकरणसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन तसेच रॅपिड अँटीजन तपासणीही करण्यात येणार आहे.

 
Top