उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शिक्षण विभागाच्या बिंदूनामावलीच्या घोळामुळे अनेक शिक्षक जिल्ह्याच्या बाहेर तिष्ठत आहेत. यामुळे आता एका आठवड्यात बिंदूनामावलीचा तिढा सोडवावा, अशा सूचना आमदार कैलास पाटील यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना केल्या आहेत.

जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या बिंदूनामावलीचा प्रश्न गेल्या चार वर्षांपासून खितपत आहे. यामुळे सर्वसाधारण वर्गातील शिक्षकांना जिल्ह्यात बदली हाेऊन येणे अशक्य झाले आहे. शिक्षक सहकार संघटना व खुला प्रवर्ग महासंघाने यासाठी सातत्याने आंदोलने केली. परिणामी आता बिंदूनामावलीचे अद्यावतीकरण करण्यासाठी वेगाने सुरुवात झाली आहे. यासंदर्भात आमदार कैलास पाटील यांनी जिल्हा परिषदेत मंगळवारी बैठक घेतली. यामध्ये आमदार पाटील यांनी कोणावरही अन्याय न होता तातडीने या प्रश्नाचा निपटारा करावा, अनेक दिवसांपासून हा प्रश्न खितपत असून शिक्षकांची निवड ज्या संवर्गातून झाली आहे, त्याच बिंदूवर त्यांना ठेवून परिपूर्ण बिंदूनामावली अपडेट करण्याच्या सूचना आमदार पाटील यांनी दिल्या. यावेळी आमदार पाटील यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने एकदा अहवाल दिला असताना त्यांच्यापेक्षा कनिष्ठ अधिकाऱ्यांची समिती याच प्रश्नावर का नेमण्यात आली, याबाबत विचारणा केली. तेव्हा शिक्षणाधिकारी मोहरे यांना याचे उत्तर देता आले नाही. यावेळी शिवसेनेेचे अन्य जिल्हा परिषद सदस्य व खुला प्रवर्ग महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top