उमरगा / प्रतिनिधी-

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरु केलेले महामार्गावरील सर्वच उड्डाणपुलाचे काम अजूनही अर्धवट स्थितीत आहे. महामार्गावरील गावात सूरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना नसल्याने अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. दरम्यान महामार्गावर निकृष्ठ दर्जाचे काम झाल्याने वारंवार महामार्गावर खड्डे पडत आहेत. त्याच्या दुरुस्तीला विलंब केला जातोय. अशा अवस्थेतही लोकप्रतिनिधींच्या आशिर्वादाने टोलवसुली धुमधडाक्यात सुरू आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, संबंधित ठेकेदार यांचा दुर्लक्षितपणा आणि लोकप्रतिनिधीचे अप्रत्यक्ष पाठबळ यामुळे महामार्गावरील असूरक्षितता धोकादायक ठरत आहे. उस्मानाबाद जिल्हयातील हद्दीतील खानापूर पासुन महाराष्ट्र-कर्नाटक सिमेपर्यंतच्या शंभर किलोमीटर अंतराच्या चौपदरीकरणाच्या कामाची मूळ किंमत ९२२ कोटी आहे. चौपदरीकरणाच्या कामाबाबतच्या सर्वे २०११ पासून सुरू झाला होता. २०१३ मध्ये कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन सोलापूरच्या एसटीपीएल कंपनीने कामाचा ठेका घेतला. शंभर किलोमीटर अंतराच्या चौपदरीकरणासाठी जवळपास तीनशे हेक्टर जमिन संपादित करण्यात आली आहे. गेल्या सहा वर्षापासून सुरू असलेले चौपदरीकरणाचे काम सुरू असुन रस्त्याचे डांबरीकरण झाले की सहा महिन्यांत खड्डे पडायला सुरुवात होते. डांबरीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले असले तरी मुरूम मोड, आष्टामोड, जकेकूर चौरस्ता, मुळज फाटा, येणेगुर येथील उड्डाणपुलाचे काम रखडले आहे. दाळीब गावात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. सूरक्षिततेच्या दृष्टीने अनेक ठिकाणी उपाययोजना नसताना सहा महिन्यापूर्वी इटकळ व तलमोड गावाजवळील दोन टोलनाक्यावर कर वसूली सुरू आहे. चौपदरीकराचे डांबरीकरण झालेले असले तरी महामार्गावर अनेक ठिकाणी अडथळे कायम आहेत. कांही ठिकाणी नव्याने झालेले काम उखडल्याचा प्रकार जागोजागी दिसुन येत आहेत. आष्टामोड, येणेगुर, मुरूम मोड, तुरोरीजवळील मुळज फाटयावरील उड्डाण पुलाचे काम रखडले आहे. दाळींब, येळी गावातही सूरक्षिततेसाठी उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. धोकादायक ठिकाण असलेल्या बलसुर मोड येथे भूयारी मार्ग अथवा उड्डाणपुलाची मागणी करूनही भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडुन दखल घेतली गेली नाही. ऐन महामार्गालगत असलेल्या जकेकुर गावातही सुरक्षित मार्ग नसल्याने अपघात होताहेत.  महामार्गावरुन दोन्ही बाजूंनी शहरात जाणा-या वळण रस्ताकडे व उमरगा शहराकडे जाणाऱ्या मार्गावरील कॉर्नर धोकादायक बनले आहे. दाबका ग्रामस्थांनी भूयारी मार्ग अथवा उड्डाणपुल करण्याच्या मागणीसाठी रस्त्याचे काम अडवले होते मात्र सुरक्षितेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना न करता दडपशाहीने डांबरीकरणाचे काम आटोपण्यात आले आहे. दरम्यान ठिकठिकाणी पडलेल्या खड्यामुळे अपघात वाढले असताना नागरिकांच्या जीवन मरणांच्या प्रश्नाकडे डोळेझाक करणाऱ्या संबंधित कंपनी व प्रशासनाबद्दल वहानधारक व नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आत्तापर्यंत आडीचशेपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असुन अनेकांच्या नशीबी अंपगत्व आले आहे.

 
Top