उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद जिल्ह्याचा इतिहास प्राचीन काळापासून प्रकाशात आला आहे. सातवाहन काळापासून ते निजामशाही पर्यंत अशा प्रगल्भ काळात उस्मानाबाद विविध हालचालींचे केंद्र असल्याचे आपल्याला दिसून येते. तेर, परंडा, नळदुर्ग, तुळजाभवानी मंदिर, रामलिंग, धाराशिव लेण्या असा ऐतिहासिक वारसा लाभलेली व संशोधनात्मक अभ्यास झालेले प्रमुख ठिकाणे जगाच्या समोर आलेले आहेत. 

उस्मानाबाद शहरापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या गडदेवदरी या धार्मिक स्थळाच्या नावातच गडाचा उल्लेख असल्यामुळे इथे एखादा किल्ला किंवा गड असावा असा प्रश्न उपस्थित राहिल्यामुळे आम्ही या ठिकाणी जाऊन संशोधन करण्याची गरज होती.  या डोंगररांगाचे सर्वेक्षण करत असताना आम्हाला देवस्थाच्या समोरील डोंगरावर एक किल्ला/गड आढळून आला. विस्तीर्ण अशा डोंगरावर वसलेला हा किल्ला या परिसरात शेकडो पर्यटक रोज भेट देत असून सुद्धा इतकी वर्षे अपरिचित राहिला. सखोल संशोधन होऊन लोकांच्या समोर न आल्यामुळे या गडाकडे दुर्गप्रेमींची पाऊले वळत नाही. ही खंत लक्षात घेऊन या किल्ल्यावर इतिहास अभ्यासक धीरज कठारे व सहकाऱ्यांनी संशोधन करण्यास सुरुवात केली आहे. ह्या गडाच्या  बांधकामावरून व सध्या असलेल्या अवशेषावरून हा गड अठराव्या  शतकाच्या अखेरीचा असू शकतो. असा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला.  सध्या या किल्ल्यावर 8 पेक्षा जास्त बुरुज असून त्यापैकी 4 बुरुज सुस्थितीत आहेत. यापैकी पूर्व आणि पश्चिम दिशेला असलेले बुरुज सहा मीटर उंच व 60 मीटरपेक्षा जास्त व्यासाचे आहेत. तसेच या किल्ल्याच्या उत्तरेकडे असलेली बुरुज अर्धवट अवस्थेत असून त्यांची पडझड झालेली आहे. किल्ल्याची तटबंदी 4 ते 5 मीटर रुंदीची असून काही ठिकाणी पडझड झालेली दिसते.  किल्ल्यावर तीन मोठे तलाव सदृश खंदक असून, त्यातून निघालेल्या दगडापासून ह्या किल्ल्यांच्या बुरुजांची व तटबंदीची बांधणी केली असावी. किल्ल्याच्या पूर्व दिशेला पायथ्यापाशी एक संपूर्णपणे ढासळलेल्या बुरुज असून त्याचा उपयोग परिसरावर नजर ठेवण्यासाठी करत  असावे. तसेच पश्चिमेला दोन मोठाले बुरूज एकमेकांना जोडलेले असून तिथे ह्या किल्ल्याचे प्रवेशद्वार असावे असे वाटते. येथून पूर्वेकडे असलेले 2 बुरुज  110 मीटर लांबीच्या तटबंदीने जोडलेले आहेत.  गडाची भौगोलिक रचना पाहता गड तीन टप्प्यात असल्याचे दिसून येत. सध्या किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात झाडाचे व गवताचे प्रमाण वाढलेले असल्यामुळे तसेच जंगली हिंस्र प्राणी यांचे वास्तव्य असल्यामुळे अभ्यासात समस्या निर्माण होत आहेत तरी लवकरच या किल्ल्याचे संशोधन पूर्ण करून उस्मानाबाद जिल्ह्यातील इतिहासात आणखी एका उपेक्षित दुर्गाचा इतिहास यानिमित्ताने इतिहासप्रेमींच्या समोर येईल.


 
Top