उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

जिल्ह्यातील उमेद स्वयंसहाय्यता समुहांना उद्योग उभारणीसाठी बँकांनी करावी आर्थिक आणि बौद्धिक मदत करावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी केले . 

  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष अंतर्गत येथील जिल्हा परिषदेत जिल्हयातील सर्व बँकांच्या जिल्हास्तरीय बँक अधिकाऱ्यांची बैठक काल श्री.गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, तेव्हा ते बोलत  होते.यावेळी जिल्हापरिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अनिलकुमार नवाळे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक निलेश विजयकर तसेच सर्व बँकांचे जिल्हास्तरीय बँक अधिकारी उपस्थित होते.     

 यावेळी उमेद अंतर्गत स्वयंसहाय्यता समुहांना विविध बँकांमार्फत वितरीत करण्यात येणाऱ्या बँक कर्ज प्रकरणे आणि  प्रलंबित खाते उघडण्याबाबत  बँकनिहाय आढावा घेण्यात आला. उमेद अभियानातील स्वयंसहाय्यता समुहांना बँक कर्ज वितरणाचा विविध बँकांचा सहभाग, जिल्हयाची सद्यस्थिती, बँकांकडुन अपेक्षा आदी विषयाबाबत सादरीकरण करण्यात आले.  २०२१-२२ अंतर्गत जिल्हयासाठी असणारे कर्जवितरणाचे उद्दिष्ट शंभर टक्के साध्य करण्याच्या अनुषंगाने बँकांनी सहकार्य करावे तसेच स्वयंसहाय्यता समुह,ग्रामसंघ आणि प्रभागसंघ या समुदाय संस्थांची प्रलंबित बँक खाती त्वरित उघडावीत असे आवाहन  श्री. नवाळे यांनी केले. यावेळी श्री . गुप्ता यांनी उद्दिष्टपूर्ती करण्याबरोबरच बँकांनी तिसरे व चौथे कर्ज प्राप्त झालेले चांगले व्यवसायप्रवण स्वयंसहाय्यता समुह शोधून त्यांना उद्योगवृद्धी करण्याबाबत बाजारपेठ, उद्योगातील बारकावे याबाबत बौद्धिक सहाय्यही  करावे. रिजर्व्ह बँकेने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे बँकांनी खाते उघडावीत आणि कर्जवितरणासाठी स्वयंसहाय्यता समुहातील महिलांना विविध उपजीविकेच्या संधी शोधून  उत्पन्नवाढीसाठी मदत करावी असे आवाहन केले. तसेच उमेद अंतर्गत महिला स्वयंसहाय्यता समुहांनी महिलांनी सुरु केलेल्या प्रचलित कंपन्यांकडुन आदर्श घेऊन तशा  पद्धतीने उद्योगवाढीसाठी प्रयत्न करावा असेही सांगितले.               

 यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री.विजयकर  यांनी महिला स्वयंसहाय्यता समुहांना तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत उपलब्ध असणारे विक्री केंद्र त्यांची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून द्यावीत अशी विनंती केली . त्याला दुजोरा देत सदर विक्री केंद्र लवकरच उपलब्ध करून दिली जातील असे श्री . गुप्ता यांनी सांगितले.                         

 यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य प्रबंधक शरद खोले, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे एकनाथ शिंदे, बँक ऑफ महाराष्ट्रचे सुनील कुमार, तसेच इतर बँकांचे जिल्हास्तरीय अधिकारी उमेद अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक अमोल सिरसट, समाधान जोगदंड तसेच सर्व तालुक्यांचे तालुका अभियान व्यवस्थापक उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ बालवीर मुंडे यांनी केले तर आभार जिल्हा व्यवस्थापक समाधान जोगदंड यांनी मानले.


 
Top