तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यातील काक्रंबा येथील तुळजापुरात दिवसाढवळ्या तरूणाची हत्या झाल्याच्या घटनेनंतर गुरुवारी मोठी खळबळ उडाली. उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर शुक्रवारी सकाळी तरूणाचा मृतदेह घेऊन नातेवाईक थेट तुळजापूर पोलीस ठाण्यात धडकले. मारेकर्‍यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी सुरू केली. आरोपींचा शोध सुरु असून लवकरच अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला.

तुळजापूर शहरातील जुन्या बस स्थानकासमोरील विश्वनाथ कॉर्नरच्या पाठीमागे गोदामाजवळ गुरुवारी काक्रंबा येथील शंकर दाजीबा गायकवाड या तरूणाचा धारदार शस्त्राने सपासप वार करून खून केल्याची घटना घडली. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकर्‍यांविरूद्ध खुनाचा गुन्हा गुरुवारीच दाखल करण्यात आलेला आहे.

दरम्यान, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल केलेला होता. आज सकाळी मृतदेह ताब्यात दिल्यानंतर नातेवाईकांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात येऊन मारेकर्‍यांना अटक करण्याची मागणी करत घोषणाबाजी सुरू केली. यावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.


 
Top