उस्मानाबाद/ प्रतिनिधी

लॉकडाऊनमुळे प्रलंबित राहिलेल्या न्यायालयीन प्रलंबित, तसेच वादपूर्व प्रकरणांमध्ये झटपट न्यायालयीन निर्णय व्हावेत, या उद्देशाने येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने येथील जिल्हा न्यायालय, तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये रविवार,दि. 1 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे. या लोक अदालतींचा संबंधितांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 दिल्ली राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि मुंबईतील राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या सुचनेनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे ही राष्ट्रीय लोकअदालत आयोजित केली आहे. कोरोना साथीमुळे पक्षकार, वकील यांना उपस्थित राहून कामकाज चालविणे शक्य झाले नाही. त्यामुळे आता या लोकअदालतीद्वारे या प्रकरणांचा निर्णय केला जाणार आहे.

 व्हॉट्सॲप अथवा ई-मेल सुविधा उपलब्ध असलेले नागरिक आणि दोन्ही पक्षकारांकडे उपलब्ध असेल तर त्यांना लोकअदालतमध्ये ऑनलाईन सहभागी होता येणार आहे. लोकअदालतच्या ऑनलाईन सूचना, पूर्वबैठका याचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे केले जाणार आहे. त्यामुळे वकील आणि पक्षकार यांनी आपले व्हॉट्सॲप क्रमांक आणि ई-मेल पत्ते संबंधित न्यायालय, बँका, पतसंस्था, शासकीय कंपन्या, स्थानिक स्वराज्य संस्था यांना उपलब्ध करुन दिल्यास गर्दीवर नियंत्रण ठेवता येईल.

 दिवाणी आणि अदखलपात्र गुन्ह्यांच्या बाबतीत, तसेच तंटामुक्ती समितीसमोर वाद मिटला असल्यास त्याबाबत निवाडा घेण्यासाठी लोकांना आणि पक्षकारांनी पुढे यावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष के.आर.पेठकर आणि वरिष्ठ न्यायाधीश तथा प्राधिकरणाचे सचिव वसंत श्री. यादव यांनी केले आहे.

 
Top