परंडा / प्रतिनिधी  -

शिक्षक हिताचे विविध प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याचे अनुषंगाने जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता ताई कांबळे यांचे दालनात प्रलंबित प्रश्नी सविस्तर सकारात्मक चर्चा करून प्रहार शिक्षक संघटने कडून निवेदन देण्यात आले.यावेळी शिक्षण समिती सदस्या उषा सर्जे-यरकळ  मॅडम ही उपस्थित होत्या.

निवेदनात नमूद विषय सन २०१९-०२० च्या जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांची निवड यादी जाहीर करावी, प्रलंबित वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके मंजूर करून आदेश निर्गमित करणे,बी.एस.सी.पात्र पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी मंजूर करून आदेश निर्गमित करणे, भविष्य निर्वाह निधी रक्कम मागणी प्रस्तावानुसार २० ते २५ दिवसांत शिक्षकांचे हक्काचा पैसा संबंधितांचे बँक खात्यात जमा व्हावा, प्रभारी पदाचा पदभार (मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख) सेवा ज्येष्ठते नुसारच देण्यात यावा, जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक शिक्षकांना निवड श्रेणी मंजूर करणे, चटोपाध्याय वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूरीसाठी प्राप्त ८२ प्रस्तावांपैकी अपात्र ठरलेल्या ४२ शिक्षकांच्या त्रुटींची पूर्तता करून घेऊन वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर करणे,३०जून २०२० पर्यंत अखंडित १२ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांचे प्रस्तावांची छाननी करून संबंधित शिक्षकांना चटोपाध्याय वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर करणे, चटोपाध्याय वरिष्ठ श्रेणी व‌ निवड श्रेणी प्रस्तावात सर्रास गोपनीय अहवालाच्या त्रुटी आहेत शिक्षण विभागाने गोपनीय अहवाल उपलब्ध करून द्यावेत किंवा गोपनीय अहवाल नोंद रजिस्टर वरून संबंधित शिक्षकांना शे-यासह प्रमाणपत्र द्यावे, बिंदू नामावली अद्यावत करून एकत्रित गोषवारा प्रत दर्शनी भागावर लावावी व संघटनेला त्याची एक प्रत द्यावी.या विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करून न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष वैजीनाथ सावंत, परंडा तालुका उपाध्यक्ष शहाजी झगडे आदि.पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top