उस्मानाबाद / प्रतिनिधी-

लाचखोर उपविभागीय अधिकारी मनीषा राशीनकर व कोतवाल जानकर यांची जेलमध्ये रवानगी करण्यात आली असुन न्यायालयाने त्याना 12 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे.  राशीनकर यांच्या अहमदनगर येथील घरावर टाकलेल्या धाडीत काय सापडले याचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही. उपविभागीय दर्जाचा अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याने महसूल विभागातील बजबजपुरी पुन्हा एकदासमोर आली आहे.  

   भूम येथील उपविभागीय अधिकारी मनीषा राशिनकर यांच्यासह कोतवाल विलास जानकर यांना वाळू माफियाकडुन लाच घेतल्या प्रकरणी भूम येथील न्यायालयाने 30 जुलैपर्यंत 2 दिवसांची पोलीस कोठडी दिली होती ती आज संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची 12 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली त्यामुळे आता या दोघांना उस्मानाबाद जिल्हा कारागृहात पाठवण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी दर्जाचा उच्च पदस्थ अधिकारी जाळ्यात अडकल्याने महसूल विभागात सुरु असलेली खुलेआम लाचखोरी उघड झाली आहे. 

 भूम परंडा येथील उपविभागीय अधिकारी यांनी वाळू माफियांकडून दरमहा १ लाख १० हजारांचा हप्ता ठरवून घेतला होता. परंतू तडजोडी अंती ९० हजार रुपये ठरले होते. त्यातील पहिला २० हजाराचा रोख हप्ता स्विकारताना लाचलुचपत विभागाने पकडले होते.  भूम परंडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू घाट असुन या भागात वाळू तस्करी खुलेआम होते.  जिल्ह्यात दगड,माती ,मुरूम वाळू असे गौण खनिज,स्टोन क्रशर, वीट भट्टी यासह अन्य कामे विनाकारवाई सुरू ठेवण्यासाठी अर्थपुर्ण बोलणी करणे आवश्यक असल्याचे या लाचखोरीतून स्पष्ट झाले आहे. 


 
Top