उस्मानाबाद / प्रतिनिधी-   

कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे.त्यामुळे हे लसीकरण योग्य प्रकारे व्हावे म्हणून लसीकरण सत्राचे योग्य प्रकारे नियोजन करण्यात येत आहे. तथापि, या लसीकरणासाठी स्थानिक, लोकप्रतिनिधी, शासकीय यंत्रणांची मदत घेण्यात यावी, अशी सूचना जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी आज पोहनेर येथे केली.

कोविड लसीकरण करण्यासाठी आरोग्य यंत्रणेसोबत इतर शासकीय व अशासकीय संस्था देखील काम करत आहेत. जिल्ह्यातील 44 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोविडच्या दुसरा डोसच्या सत्राचे आयोजन आज केले होते. यापैकी पोहनेर येथील लसीकरण सत्राच्या ठिकाणास भेट देऊन लाभार्थ्यांची माहिती घेऊन व यंत्रणांच्या तयारीची पाहणी श्री. गुप्ता यांनी आज केली आणि उपस्थित 50-60 लाभार्थी यांच्याशी संवाद साधून कोरोना प्रतिबंधासाठी कोविड लसीकरण करुन घेणे अत्यावश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

 यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील स्वच्छता, रुग्णांना पाण्याची व्यवस्था, जाणीव जागृती, साहित्याचे प्रदर्शन, अभिलेख वर्गीकरण व वृक्षरोपणाचे काम, लसीकरणाच्या सुरक्षिततेची तयारी पाहून श्री. गुप्ता यांनी समाधान व्यक्त केले. तसेच यापुढे शासकीय यंत्रणेवरील विश्वास वाढविण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सेवा समाजाभिमुख व्हाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही.वडगावे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

 
Top