उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मोका व चोरीच्या गुन्ह्यामध्ये गेल्या सात वर्षांपासून फरार असलेल्या एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आली.

तामलवाडी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का व चोरीचा गुन्हा दाखल असलेला भाऊसाहेब मधुकर पवार उर्फ टुरम्या (४८, रा. वडशिवणी, ता. करमाळा, जि. सोलापूर) याचा पोलिस गेल्या सात वर्षापासून शोध घेत होते. तो पोलिसांना हुलकावणी देत असल्याने त्याचा निश्चित ठावठिकाणा लागत नसल्याने पोलीस त्याच्या तपासावर होते. तपासादरम्यान गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग माने, सदानंद भुजबळ, हवालदार काझी, शेळके, नाईक हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, हवालदार बबन जाधवर, सर्जे, अविनाश मरलापल्ले, आरसेवाड, माने यांच्या पथकाकला भाऊसाहेब पवार हा त्याच्या गावी परतल्याची गोपनीय खबर मिळाली. तेव्हा पथकाने सोमवारी पहाटे त्याच्या घरास वेढा घालून त्यास घरातून ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी तामलवाडी पोलिसांच्या स्वाधिन केले.


 
Top