उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून शालेय पोषण आहार योजनेंतर्गत वाटप केलेला तांदुळ फोर्टीफाइड तांदुळ असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, हा तांदूळ प्लास्टिकचा असल्याच्या अफवांमुळे जिल्ह्यातील पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. काही संघटनांनी तर यासंदर्भात चौकशीसाठी निवेदनही सादर केली.

शाळांना पुरवठा केलेला तांदुळ प्लास्टिकचा असल्याच्या तक्रारी तुळजापूर तालुक्यातील काटगाव, भूम व उस्मानाबाद तालुक्यातूनही आल्या होत्या. यामुळे काही ठिकाणी पालकांनी हा तांदुळ देण्यास विरोध केला. यासंदर्भात शिक्षण विभागासह प्रशासनाकडे तकारीही देण्यात आल्या. यामुळे प्रशासनही गोंधळात पडले होते. यानंतर प्रत्यक्ष विचारणा करून या तांदळाबाबत शहानिशा केल्यानंतर हा फोर्टीफाईड राइस असल्याचे निदर्शनास आले आहे. 

 तुळजापूरचे गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव यांच्याकडेही तक्रार आली होती. त्यांनी काटगाव गाठले. तांदुळ शिजवून त्याची चव घेतली. त्यांनी प्लास्टिकचा तांदुळ नसल्याचे उपस्थित ग्रामस्थांच्या निदर्शनास आणुन दिले. यावेळी मंगरूळ बीटचे विस्तार अधिकारी मल्हारी माने, केंद्रप्रमुख वाले, शालेय समितीचे अध्यक्ष संताेष महाजन, ग्रामसेवक झाडे, उपसरपंच अशोक माळी, मुख्याध्यापक बी. आर. सपकाळे उपस्थित होते.

 

 
Top