उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद,  टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर , कोहिजन फाऊंडेशन ट्रस्ट आणि एचडीएफसी बँक सी एस आर यांच्या अर्थ सहाय्याने  कोरोना लसीकरण जनजागृती अभियानाची सुरुवात व कोरोना माहिती पत्रिकेचे अनावरण अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता प्रा. रमेश जारे डॉ. गुणवंत बिराजदार कोहिजन फाऊंडेशन ट्रस्टचे प्रकल्प समन्वयक श्री. दयानंद वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले म्हणाल्या की, ज्या-ज्या वेळेस स्वयंसेवी संस्थांनी व नागरिकांनी  शासनाच्या कार्यात सहभाग दिला आहे.  त्या त्या वेळेस शासनाच्या विविध योजना,अभियान आपण यशस्वी केले आहेत.  सध्या आलेले कोरोनाचे संकट ही  आपण सर्वांच्या सहभागातून दूर करण्यामध्ये यशस्वी होवू.

 या प्रसंगी टाटा सामाजिक विज्ञान संस्था व कोहिजन फाऊंडेशन ट्रस्ट यांनी सुरू केलेले समुपदेशन व कोरोना लसीकरण जनजागृती कार्य हे लोकोपयोगी व महत्वपूर्ण आहे.  या लसीकरण जनजागृतीचा फायदा नागरिकांनी घेऊन आपल्या जिल्ह्याचे 100 टक्के लसीकरण पुर्ण करण्यासाठी सहकार्य करावे असे आव्हान केले.

या प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे म्हणाले की, टाटा सामाजिक विज्ञान संस्था व कोहिजन फाऊंडेशन ट्रस्ट यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कोरोना लसीकरण जनजागृती अभियानाचा फायदा हा ग्रामीण भागातील वाड्या,वस्त्या, तांडे या ठिकाणचे लसीकरण मोठ्या प्रमाणात होण्यामध्ये होणार आहे.  त्यामुळे नागरिकांनी कोरोना लसीकरण मोहिमेत सहभाग घ्यावा असे आव्हान केले. 

प्रा. रमेश जारे म्हणाले की, सद्यस्थितीत जरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून आता या कालावधीतच जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणे  अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि  तोच उद्देश लक्षात घेवून आम्ही तालुका निहाय व प्राधान्याने ज्या गावातून जास्त प्रमाणात कोरोना पॉज़िटिव पेसेण्ट आले आहेत त्या गावातील तसेच इतर ही गावातील नागरिकांच्या मनात लसीकरणाच्या बाबतीत असलेले  प्रश्न, शंका दुर करण्याच्या अनुषंगाने व मोठ्या प्रमाणात लसीकरण होण्यासाठी हे अभियान महत्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगितले.  

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कोरोना समुपदेशन कार्यक्रम समन्वयक गणेश चादरे म्हणाले की, रुग्णांच्या शारीरिक आरोग्या बरोबरच त्यांचे मानसिक आरोग्य ही समजून घेवून आम्ही सुरू केलेल्या समुपदेशन हेल्पलाईनचा व कोरोना लसीकरण जनजागृती अभियानाचा फायदा नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत असल्याचे सांगितले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर दावणे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  मनोहर दावणे,आनंद भालेराव, शंकर ठाकरे, सोनाली गुजराती, शुभांगी कुलकर्णी, किरण कदम, ज्ञानेश्वर बनसोडे, कवी प्रदीप पाटील, चंद्रकांत रोकडे, दिनेश भोसले यांनी अथक परिश्रम घेतले.

 
Top