उस्मानाबाद / प्रतिनिधी-
भूम येथील उपविभागीय अधिकारी मनीषा राशिनकर यांच्यासह कोतवाल विलास जानकर यांना लाच घेतल्या प्रकरणी भूम येथील न्यायालयाने 30 जुलैपर्यंत 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राशिनकर यांच्यावर दि. २७ जुलैच्या सायंकाळी उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. रात्री उशीरा या प्रकरणात त्यांच्याविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला होता. 
परंडा तालुक्यातील जेकटेवाडी येथील एका वाळू वाहतूक करणाऱ्या विक्रेत्यास वाळूचा व्यवसाय चालू करण्यासाठी व तक्रारदार यांचा एक टीप्पर व त्याच्या पाहुण्यांचा जेसीबी व तीन ट्रक्टर हे विना कारवाई वाळू वाहतुकीसाठी चालू देण्यासाठी  १ लाख १० हजार रुपयाची मागणी करण्यात आली होती. परंतू तडजोडी अंती ९० हजार रुपये ठरविण्यात आले. यावेळी वाळू व्यवसायीक पंचासमक्ष उपविभागीय अधिकारी राशीनकर यांनी लाचेची मागणी केली होती. यापैकी २० हजार रुपये रोख देण्यात यावे, असे सांगण्यात आले, सदर रक्कम कोतवाल जानकर यांच्याकडे देत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागने कारवाई केली.  
 याप्रकरणी पोलीस ठाणे भुम येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया २७ जुलैच्या रात्री उशीरापर्यंत चालू होती.  पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक ब्रम्हदेव गावडे यांच्या मागर्शनाखाली  सापळा अधिकारी पोलीस उप अधीक्षक प्रशांत संपते, पोलिस निरीक्षक गौरिशंकर पाबळे, अंमलदार दिनकर उगलमुगले, विष्णू बेळे, विशाल डोके यांच्या टिमने कारवाई केली. 
दोन ठिकाणी छापे 
उपविभागीय अधिकारी मनीषा राशिनकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच प्रकरणात अटक केल्यानंतर त्यांच्या भूम येथील घरांची झडती घेण्यात आली. त्याचप्रमाणे अहमदनगर येथील त्यांच्या घराची नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टीमने झडती घेतली आहे. या झडतीमध्ये नेमके काय मिळाले ? या संदर्भात दोन दिवसात माहिती मिळेल, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले आहे. 
 
Top