उस्मानाबाद/ प्रतिनिधी

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींनी जनता अगोदरच त्रस्त असताना आता गॅसची दरवाढ करून जनतेला आणखी एक झटका दिला आहे. उस्मानाबाद जिल्हयासह तालुक्यातील सामान्यांचे  सामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.  घरगुती गॅस सिलिंडर व कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. घरगुती गॅस तब्बल २५.५० रुपयांनी महागला तर कमर्शियल सिलिंडरच्या किमतीत ८४ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

एकीकडे गॅसचे दर गगणाला भिडले असताना सबसिडीही अवघ्या ८ रुपयांची मिळत आहे. जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात मोठे बदल करण्यात आले आहेत. आता घरगुती गॅस सिलिंडरचा दर ८३४ रुपयांवरुन थेट ८५९.५० रुपये झाला आहे. ही दरवाढ एक जुलैपासून लागू झाली आहे. या आगोदर एक जून रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नव्हते. जून महिन्यात घरगुती गॅसची किंमत ८३४ रुपये होती. जुलै महिन्यात थेट २५.५० रुपयांची वाढ झाली.

तसेच जून महिन्यात कमर्शियल सिलिंडरची किंमत १५५९ रुपये इतकी होती. परंतु जुलै महिन्यात कमर्शियल सिलिंडरच्या दरातही ८४ रुपयांची वाढ होऊन त्याची किंमत १६४१.५० रुपये झाल्याने व्यावसायिकांचेही या दरवाढीमुळे कंबरडे मोडले आहे. २०२१ या वर्षात घरगुती गॅसच्या किमती मध्ये सर्वाधिक वाढ झाली असल्याने दिसत आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे अगोदरच हाल होत असताना गॅसच्या किमती वाढल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे. तसेच गॅसच्या वाढलेल्या किमतीमुळे ग्रामीण भागात पुन्हा इंधन म्हणून वृक्षतोड वाढण्याची भीती वाटू लागली आहे. पूर्वी मोठ्या प्रमाणात गॅस वापरण्याचे प्रमाण हे शहरी भागात होते. परंतु आता ग्रामीण भागातही सर्वसामान्यांच्या घरोघरी गॅस आले आहेत. यामुळे दरवाढीची झळ सर्वसामान्यांनाच बसत आहे.


 
Top