उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तुळजापूर नगर परिषद अंतर्गत विविध आर्थिक व प्रशासकीय अनियमिततेच्या बाबतीत चौकशी करण्यासाठी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी 4 सदस्य असलेली चौकशी समिती गठीत केली आहे.भूसंपादन उपजिल्हाधिकारी राजकुमार माने यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली असून या समितीने तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. तुळजापूर नगर परिषद बाबत समाजसेवक राजाभाऊ माने यांनी विविध तक्रारी केल्या होत्या त्यातील अनेक प्रकरणात चौकशी दरम्यान अनियामीतता,अपहार झाल्याचे स्पष्ट झाले होते व त्याबाबत फौजदारी गुन्हे आणि इतर कारवाई करण्याचे आदेशीत झाले होते मात्र संबंधीत अधिकाऱ्यांनी त्याची अंमलबजावणी न केल्याने काही प्रकरणे प्रलंबीत आहेत. कारवाई न केल्याने प्रलंबित राहिलेल्या प्रकरणाची चौकशी आता होणार आहे. 

तुळजापूर शहरात प्रवेश केल्यानंतर प्रत्येक वाहनाकडून पार्किंगच्या नावाखाली प्रवेश कर वसुली केली जात होती या प्रकरणी चक्क 30 फेब्रुवारी रोजीचे करारपत्र करण्यात आले होते. 30 फेब्रुवारी ही तारीख शोधण्याची किमया या घोटाळेखोर ठेकेदार यांनी केली होती. या प्रवेशकर वसुलीत तुळजापूर येथील अनेक राजकीय नेते समाविष्ट असून त्यांची नावे या करारपत्रात आहेत. विशेष म्हणजे खुद्द तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी या प्रकरणाची व्यक्तिशः दखल घेतली होती व या प्रकरणात संबंधीतावर गुन्हे नोंद करण्याचे आदेश तुळजापूरचे तत्कालीन मुख्याधिकारी आशिष लोकरे यांना 7 ऑक्टोबर 2018 रोजी दिले होते मात्र अद्याप कारवाई झाली नाही.

तुळजापूर नगर परिषदेच्या अंतर्गत 2016-17 मधील यात्रा अनुदान प्रकरणात बनावट निविदा प्रक्रिया करून 3 कोटी 8 लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याने यांची चौकशी करावी. तुळजापूर नगर परिषदेचे 2014-15,2015-16 व 2016-17 या कालावधीचे विशेष लेखापरीक्षण करणे. 2016 साली करण्यात आलेल्या 1 कोटी 78 लाख रकमेचा अपहार केल्या प्रकरणी कारवाई करून रक्कम वसुली करणे. पाणीपुरवठा साहित्य खरेदी न करता 72 लाख अपहार केल्याचे प्रकरणसह अन्य प्रकरणची चौकशी करण्याची मागणी राजाभाऊ माने यांनी केली होती त्यावर आता जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मध्यंतरीच्या काळात कोरोनामुळे याबाबत कारवाईची मोहीम थंडावली होती मात्र आता त्याला गती येणार आहे. या प्रकरणी चौकशी समितीचे अध्यक्ष राजकुमार माने यांनी तुळजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासह अन्य संबंधित यांना लेखी नोटीस काढल्या असुन याची पहिली सुनावणी 29 जुन रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.

जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या चौकशी समितीत भूम मुख्याधिकारी तानाजी चव्हाण,लेखाधिकारी सचिन देशपांडे व आर एन डंके यांचा समावेश आहे.

 
Top