मुरूम / प्रतिनिधी-

पारंपारिक खरीप  पीक पद्धतीतून मिळणारे उत्पन्न कमी होत चालले असल्याने काही उत्साही शेतकरी धाडस करून ओलिताखालील शेतीतून शेतीचे नवनवीन प्रयोग करत आहेत. तालुक्यातील बेळंब येथील येथील 6  शेतकरी मिळून  ग्रुप पद्धतीने बसवराज वरनाळे,राजेंद्र कारभारी,श्रीकांत बाबशेट्टी,कलेश्वर येलगुंदे,अनिल बिराजदार  यांनी मिळून  8 एकर क्षेत्रात पेरूची लागवड केली आहे. पहिला बहर चांगला बसला. परंतु, प्रत्यक्षात उत्पन्नही सुरू झाले मात्र लॉकडाउनच्या स्थितीमुळे बाहेरची बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने कमी दरात पेरूची विक्री होत आहे.

तालुक्यात कोरडवाहू शेतीचे क्षेत्र अधिक आहे. निसर्गावरच शेतीतील उत्पन्न अवलंबून असते. तालुक्यात मागील पाच- सहा वर्षांपासून अवेळी होणाऱ्या पावसामुळे उत्पन्नात घट होत आहे. पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतात अनेक शेतकरी फळबाग, पालेभाज्यासह अन्य पिके घेण्याचा नव नवीन प्रयोग करत आहेत. 

बेळंब येथील 6  शेतकरी   मिळून 8 एकर क्षेत्रात पेरूची बाग करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तालुका कृषी अधिकारी सुनील जाधव यांच्याशी संपर्क करून पांडुरंगराव फुंडकर फळबाग योजनेचा लाभ घेतला. योजनेतून आत्तापर्यंत 2ते अडीच लाखांचे अनुदान त्यांना मिळाले आहे. पेरूच्या लागवडीसाठी कलकत्ता राज्यातून  एका जातीचे वाण असलेले पेरू प्रत्येकी 50 रुपये प्रमाणे 4 हजार  रोपांसाठी दोन लाख वीस हजार रुपये खर्च आला. पेरू रोपासह खड्डे मारणे, लागवड, ठिबक असा साडेपाच  लाख रुपयाचा खर्च करण्यात आला. या पेरूची लागवड 4 ऑगष्ट २०१९ ला करण्यात आली. साधारणतः १७ महिन्यानंतर पेरू पिकाला बहर आला. या बागेची पाहणी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी सुनील जाधव व कृषी सहाय्यक  सुतार यांनी प्रत्येक्षात जाऊन शिवारात  पाहणी केली. चांगल्या पद्धतीने बाग आल्याचे पाहून बेळंब शेतकर्यांचे  कौतुक केले. पहिल्या बहरात एका पेरूचे वजन साधारणतः आठशे ते तेराशे ग्रॅम आहे. ७० ते ८० क्विंटल उत्पन्न अपेक्षित आहे, त्यातील पंचवीस क्विंटल पेरूची विक्री झाली. परंतु, बाहेर जिल्ह्यातील बाजारपेठ लॉकडाउनमुळे बंद असल्याने किमान साठ ते सत्तर रुपये किलो मिळणारा दर १७ ते तीस रुपयांवर आल्याने अधिक मिळणारा फायदा घटला आहे.

पेरूच्या बागेचे उत्पन्न साधारणतः २० वर्षांपर्यंत घेता येते. पहिल्यांदा लागवडीचा खर्च मोठा असतो. त्यानंतर फोम, कॅरिबॅग व पेपर लावण्यासाठी खर्च येतो. पहिला पेरूचा बहर चांगला आला. मात्र, लॉकडाउनने तो हिरावून घेतला. पुणे, हैदराबादची बाजारपेठ बंद आहे. सोलापूरला माल पाठवला मात्र दर कमी मिळाला. आता सोलापूर बाजारपेठ ही उपलब्ध होत नाही. सद्यस्थितीत पिकलेले वजनदार पेरू खाली पडताहेत. लॉकडाउनची स्थिती नसती तर 8  एकरातून किमान 20 ते 25 लाखांहून अधिक उत्पन्न मिळाले असते.

 
Top