प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने देण्यात आले निवेदन 

उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांनी चांगला मुकाबला केला आहे. मात्र, येणाऱ्या तिसऱ्या लाटेत मुकाबला करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ विशेषत: कुशल डॉक्टर्स, नर्सेसची कमतरता जाणवणार आहे. यासाठी सर्व आयुर्वेदिक व बीएएमएस डॉक्टर्स यांना एक महिन्याचे कोविड इन्टेन्सिव्ह ट्रेनिंग देण्याची मागणी प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा तथा मराठवाडा समन्वयक डॉ. स्मिता शहापूरकर यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कोरोनात महाविकास आघाडी सरकार नियोजनपूर्वक काम करत आहे. पहिल्या लाटेत बेड उपलब्धता, उपचाराची उपलब्धता याचा सामना करावा लागला. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन व रेमडेसिवीर औषधांसाठी खूप प्रयत्न करावे लागले. यामुळे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी समाधानकारक यंत्रणा उभी राहिली आहे. पुढील काळात येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या वेळी कमतरता भासणार नाही. मात्र, मनुष्यबळ विशेषत: कुशल डॉक्टर्स, नर्सेस यांची कमतरता जाणवणार आहे. कार्यरत सर्व स्टाफ थकून गेला आहे. यासाठी सर्व आयुर्वेदिक व बीएएमएस डॉक्टर्सना एक महिन्याचे कोविड इन्टेन्सिव्ह ट्रेनिंग देण्यात येऊन त्यांना पुढील काळात कोविड रुग्णालयांमध्ये काम करण्यास उद्युक्त करावे.

या मोहिमेत जे सहभागी होतील त्यांनाच नंतर एका ब्रिज कोर्सद्वारे अॅलोपॅथिक व आधुनिक वैद्यकशास्त्राच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात यावा.

त्यासाठी पूर्वी तीन वर्षाचा कोर्स होता, तो पुन्हा सुरू करण्यात यावा. यामुळे दोन वर्षात आधुनिक वैद्यक शास्त्राचे पदवीधर जास्तीत-जास्त निर्माण व्हावेत, यासाठी उपलब्ध असलेल्या आयुर्वेदिक महाविद्यालयांचे रुपांतर अाधुनिक वैद्यक शास्त्राच्या महाविद्यालयांमध्ये करण्यात यावे.निवेदनावर स्त्रीरोग तज्ञ डॉ. ललिता स्वामी, डॉ. श्रद्धा मुळे, डॉ. परवीन पल्ला यांच्या स्वाक्षरी आहेत.


 
Top