उस्मानाबाद /प्रतिनिधी-

सहकाराचा उगम माणसांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झाला असून, पतसंस्था या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी निर्माण झाल्या आहेत. विशेष म्हणजे पूर्वी महिलांचा सहकार क्षेत्रामध्ये वावर नव्हता. आता महिला सहकारच नाही, तर सर्वच क्षेत्रात अग्रेसर असून त्यांच्याकडे साधनशुचिता अधिक असते. त्या साधनशुचितेमुळेच महिलांच्या सहकारी पतसंस्था चांगल्या पद्धतीने चालतात, असे ठाम प्रतिपादन सहाय्यक निबंधक राजेंद्र गायकवाड यांनी दि.३० जून रोजी केले. 

शहरातील रामनगर येथील महात्मा गांधी भवनमध्ये प्रियदर्शिनी इंदिरा गांधी महिला सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन आशा स्वयंसेविका  तैमुन्निसा शेख व रुग्ण सेविका अनिता रायबान यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  प्रियदर्शिनी इंदिरा गांधी महिला सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष डॉ. स्मिता शहापूरकर, उपाध्यक्ष डॉ. कौशाली राजगुरु, आशा कांबळे, सुरेखा काशिद, समर्थ सहकारी बँकेचे व्यवस्थापक धनंजय कुलकर्णी, नागनाथ नागणे, प्रभात पतपेढीचे डॉ‌. डी.बी. मोरे,  संचालक शकुंतला भन्साळी, रहेमुन्निसा शेख, आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना डॉ. डी.बी. मोरे म्हणाले की, माणसाला आशा पुष्कळ असतात. त्या कशाही पूर्ण होतात. मात्र त्यासाठी जिद्द असली पाहिजे. महिलांना एकत्रित करून पतसंस्था उभा केली याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

 पतसंस्थेच्या अध्यक्ष डॉ. स्मिता शहापूरकर म्हणाल्या की, राज्यात बचत गटाचे फेडरेशन स्थापन करण्याची संकल्पना ही उस्मानाबाद येथील लोकप्रतिष्ठानचीच आहे.  महिलांची सहकारी पतसंस्था उभा करावी असा संकल्प करून त्यासाठी राजेंद्र गायकवाड, डी.जी. कुलकर्णी, डॉ. डी.बी. मोरे व नागणे यांच्या मार्गदर्शनामुळे ती प्रत्यक्षात आज उभारली आहे. विशेष म्हणजे महिलांकडे मोठ्या प्रमाणात आर्थिक सूक्ष्म नियोजनाचे कौशल्य आहे. निर्माण होत असलेल्या एकूण संपत्तीपैकी ५० ते ६० टक्के संपत्ती महिलांच्या कामातून निर्माण होते. परंतु त्याची कुठे नोंद होत नाही. अर्थव्यवस्थेमधील स्त्रियांच्या क्षमतेचा आणि कामाचा ठळक ठसा जगासमोर आणायचा असेल तर सहकारी पतसंस्था हे एक उत्तम माध्यम आहे.  यावेळी अलका मगर, आशा कांबळे, तैमुन्निसा शेख, अनिता रायबान, धनंजय कुलकर्णी, नागनाथ नागणे यांनी आपले विचार व्यक्त केले.  

 सूत्रसंचालन सुरेखा जगदाळे व मंजुषा वैराळे यांनी तर उपस्थितांचे आभार डॉ. कौशाली राजगुरु यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पतसंस्थेचे कर्मचारी आवेज शेख, अलका वीर, शिवाजी पवार आदींनी परिश्रम घेतले.


 
Top