उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा  यांच्या संयुक्त विद्यमाने घरकूल मार्ट हा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हाभरात राबविला जात आहे.त्यामुळे गावातच बांधकाम साहित्य उपलब्ध होत आहे.त्यामुळे ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहेत.

उमेद-अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचे स्वयंसहाय्यता समूह स्थापन केले जातात.महिलांना विविध कौशल्य आणि व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंपूर्ण बनविण्याचे काम उमेद अभियानामार्फत केले जाते.त्याचाच एक भाग म्हणून महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत जिल्हाभरात जिल्ह्यात नऊ  घरकूल मार्ट कार्यान्वित करण्यात आली आहेत.ग्रामविकास विभागामार्फत प्रत्येकाला हक्काचं घर हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या अनुषंगाने राज्य तसेच केंद्र शासनामार्फत  प्रधानमंत्री आवास योजना,रमाई आवास योजना,शबरी आवास योजना,पारधी आवास योजना आदी घरकूल आवास योजना राबविण्यात येत आहेत.

या योजनेंतर्गत गावातील प्रत्येक कुटूंबाला शासनामार्फत अर्थसहाय्य करण्यात येते. या योजनांच्या लाभार्थ्यांना घरकूल बांधकामासाठी आवश्यक असलेले बांधकाम साहित्य गावातच घरकूल मार्टच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जात आहे. 2020-21 अंतर्गत विविध आवास योजनांच्या माध्यमातून जिल्हयाला 20 हजार 721 एवढया घरकूलाचं उद्दिष्ट साध्य करावयाचे आहे.20 हजार 495 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे.

 या घरकूल योजनांअंतर्गत गावातील लाभार्थ्यांना बांधकामासाठी लागणारे सिमेंट,खिळे, विटा,टिकाव,फावडा,पाटी,बाथरूम भांडे,तसेच इतर साहित्य गावातच उपलब्ध व्हावे,त्यांचा वाहतूक खर्च वाचावा म्हणुन दर्जेदार साहित्य  घरकूल मार्टच्या माध्यमातुन विक्री करण्यात येत आहे. घरकूल  मार्ट उमेद महिलांच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहेत.गावातच मिळणारे बांधकाम साहित्य घरकूल मार्ट मधुनच खरेदी करावे,असे आवाहन जिल्हा अभियान सहजिल्हा अभियान संचालक तथा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे यांनी केले आहे.

  उपक्रमांतर्गत सद्यस्थितीत उस्मानाबाद तालुक्यातील कनगरा, ढोकी, तुळजापूर तालुक्यातील बारूळ,लोहारा तालुक्यातील जेवळी,भूम तालुक्यातील आंबी, पाडोळी, वाशी तालुक्यातील सारोळा(मां) कळंब तालुक्यातील दहीफळ,पिंपळगाव डोळा असे एकुण नऊ घरकूल मार्ट सुरू करण्यात आले आहेत.त्यातून महिलांना मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळवत आहेत.राज्यभर घरकूल मार्टची अभिनव संकल्पना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.हेमंत वसेकर यांच्या तसेच जिल्हयात  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड,प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.आगामी वर्षात इतरही गावांमध्ये घरकूल मार्ट सुरु होणार असल्याचे जिल्हा अभियान व्यवस्थापक डॉ.बलवीर मुंडे यांनी सांगितले. या उपक्रमाचे सर्व ग्रामस्थांकडून मोठया प्रमाणावर कौतूक केले जात आहे.याबाबत प्रतिक्रिया अशा:-१)सुवर्णा अर्जून कोकरे,अध्यक्षा, जिजामाता महिला ग्रामसंघ पाडोळी (सु)

 ‘’ उमेद अभियानामुळे महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यास सक्षम झाल्या आहेत.आम्ही नुकतेच घरकूल मार्ट सुरु केले आहे. ग्राहकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. गावात सुरु असलेल्या बांधकामाचे साहित्य दर्जेदार आणि माफक दरात गावातच उपलब्ध झाल्यामुळे ग्रामस्थदेखील अत्यंत खूश आहेत.उमेद अभियान खऱ्या अर्थाने जीवनोन्नतीचे काम करत आहे.आम्ही उमेदचा भाग असल्याचा मनस्वी आनंद होतो आहे.”

२)अनिलकुमार नवाळे,सहजिल्हा अभियान संचालक तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,उस्मानाबाद-“जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणे अंतर्गत उस्मानाबाद जिल्हयात प्रधानमंत्री आवास योजना,रमाई आवास योजना,शबरी आवास योजना,पारधी आवास योजना यासारख्या योजना राबविल्या जात आहेत.या योजनेतील लाभार्थी तसेच गावातील इतर बांधकामांसाठी आवश्यक असलेलं साहित्य,उमेद महिलांच्या मार्फत घरकूल मार्टमध्ये उपलब्ध करून देत आहोत.उमेद अभियानामार्फत उपजीविकावृद्धीचं आणि महिला सक्षमीकरणाचं काम जिल्हाभरात मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. सर्व गावकऱ्यांनी आपल्या गावातील घरकूल मार्टला भेट द्यावी.तसेच आपल्या बांधकामांसाठी आवश्यक साहित्य घरकुल मार्ट मधुनच खरेदी करावं”


 
Top