उमरगा / प्रतिनिधी-:

 कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात लग्न तसेच इतर सण, धार्मिक सोहळे आदीं ठिकाणी गर्दी होत असल्यामुळे शासन व प्रशासनाने निर्बंध घालण्यात आले आहेत. अनेकांना या संसर्ग  काळात तारखा बदलून घ्याव्या लागल्या, काहींनी शासनाच्या नियमांचे पालन करत सोहळे आटोपले. ही परिस्थिती लक्षात घेता या काळामध्ये रजिस्टर मॅरेज उत्तम पर्याय ठरला आहे.

बदलत्या काळानुसार विवाह, मुलामुलींचे वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस आदी सोहळ्याचे स्वरूप बदलत चालले आहे. गावातील एकाद्या प्रतिष्ठाने लाखो रुपये खर्च करून प्रसंगी कर्ज काढून लग्न समारंभाचे आयोजन केल्याने गोर गरीब व सामान्य नागरिक केवळ दिखाव्यासाठी लग्न मोठे करण्यासाठी लाखों रुपयांचे कर्ज काढून लग्न करत आहेत. शेतीत उत्पन्न निघाल्यास कर्ज फेडले जाते अन्यथा कर्जाचा डोंगर सोसत जगताना कर्ज वाढत चालल्याने आत्महत्या करणारे अनेक उदाहरण आपल्या महाराष्ट्र राज्यात आहेत. असे असताना कासार आष्टा येथील मुळ रहिवाशी असलेले तथा व्यवसाया निमित्त पुण्यात वास्तव्यास असलेले ॲड सयाजी शिंदे व साधना शिंदे यांची मुलगी समता शिंदे हिने स्वतः सायकॉलॉजिस्ट असून स्वतःचा जोडीदार नाशिक येथील सिव्हिल इंजिनियर तथा शासकीय ठेकेदार राकेश पवार यांच्यासोबत निश्चित करत नोंदणी पध्दतीने विवाह करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. समता आणि राकेश दाम्पत्यांनी नाशिक येथील विवाह नोंदणी कार्यालय येथे कुटुंबासह नातेवाईकांच्या उपस्थित लग्नगाठ बांधली. राकेश पवार नाशिक येथे जलसिंचन विभागात शासकीय कंत्राटदार असून समता ही  सायकॉलॉजीस्ट आहे. समता व राकेश दोघेही छात्र भारती, राष्ट्र सेवा दल या समाजवादी संघटनेचे कार्यकर्ते आहेत. मात्र राकेशचे आई-वडील यांचा चळवळीशी काही संबंध नसताना, शिवाय वडील गावचे दहा वर्ष सरपंच व स्थानिक संस्थेचे अध्यक्ष असूनही त्यांनी या नोंदणी विवाहास संमती देवून दोघेही नातेवाईकांसह आनंदाने नोंदणी विवाह सोहळ्यात सहभागी झाले.

 याबाबत सायकॉलॉजीस्ट असलेल्या समता सयाजी शिंदे बोलताना म्हणाल्या, राज्यात कोरोनासोबतच शेतकरी कर्ज बाजारी होत आहेत.उत्पादित पिकास दर नसल्याने केलेला खर्चहि निघत नाही.अशा वेळी पदरमोड करून कर्ज काढून लाखोंचा खर्च करून, बँड-बाजा, बारात, रोषणाई, डीजे लावून लग्न सर्रास पहायला मिळतात. अनेक प्रबोधनकार यांनी विवाह साध्या पद्धतीने करा असे सांगूनही समाज परिवर्तन होताना दिसत नाही. या परिवर्तनाची खरी सुरुवात माझ्या आई-वडीलांनी १९९५ रोजी नोंदणी विवाह करून परिवर्तन केल्यामुळे आता बदलत्या काळात याची सुरुवात स्वतःपासून करायची हि खूणगाठ मनाशी बांधून राकेश सोबत नोंदणी पध्दतीने विवाह केले. यातून समाजातील एका जरी जोडप्याने आदर्श घेतला तरी आम्हाला त्याचे समाधान असेल.

 
Top