उस्मानाबाद / प्रतिनिधी-

वाशी तालुक्यातील तेरखेडा जवळील लक्ष्मी पारधी वस्तीजवळ सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास कंटेनर पलटी झाल्याची घटना घडताच अज्ञात चोरट्यांनी कंटेनरवर डल्ला मारत ६९ लाख रुपयांचा माल लंपास केला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवताच काही माल हस्तगतही करण्यात आला असला तरी अजूनही माेठ्या प्रमाणात माल गायब आहे.

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील लक्ष्मी पारधी वस्तीजवळ पहाटे ३ च्या सुमारास कंपनीच्या वस्तू पार्सल करणारा कंटेनर पलटी झाला. कंटेनर पलटी झाल्याचे पाहून त्या ठिकाणी असणाऱ्या चोरट्यांनी याचा फायदा घेत गाडीतील ६९ लाख रुपयांचा माल लंपास केला.इंकाॅम एक्सप्रेस कंपनीचा पार्सल वाहतूक करणारा कंटेनर एचआर ५५ एजे ०१८६ बंगळुरूहून दिल्लीकडे जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील तेरखेडा येथील लक्ष्मी पारधी वस्तीजवळ उलटला, त्यानंतर परिसरातील नागरिकांनी कंटेनरचा दरवाजा तोडला व त्यातील महागड्या वस्तू मोबाइल एलईडी, कॉम्प्युटर तसेच लहान मुलांची महागडी खेळणी, असे साहित्य चोरी केलेे.

 पहाटे पाच वाजता येरमाळा पोलिस स्टेशनला ही माहिती समजली. येरमाळा पोलिस स्टेशनचे सब इन्स्पेक्टर ज्ञानेश्वर राडकर घटनास्थळी दाखल झाले व घटनेची पाहणी केली पाहणी करून वरिष्ठांना माहिती सादर केली. त्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी मोतीचंद राठोड,स्थानिग गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, सपोनि निलंगेकर, पोलीस सब इन्स्पेक्टर माने, वाशी पोलीस ठाण्याचे पीएसआय निरगुडे, कळंब पोलीस ठाण्याचे एपीआय पवार, पोलिसांचा ताफा व दंगल पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून लक्ष्मी पारधी वस्तीवरील लोकांना कंटेनरमधील वस्तू ताबडतोब जमा कराव्यात, असे आवाहन केले. मात्र त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद न मिळाल्याने पारधी वस्तीत घराघरात तपासणी करण्यास सुरुवात केली तसेच ड्रोन कॅमेऱ्याच्या तपासणीनंतर काही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कार्यवाही चालू असताना पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन घटनास्थळी दाखल झाले. कंटेनर चालक गणसेठ इंद्रीस खान यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुध्द येरमाळा पाोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

 
Top