उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जालना येथून सांगलीकडे जाणारा ट्रक (एम.एच. ०९ एल ७०६३) हा १२ जून रोजी सांगलीकडे जात होता. दरम्यान रात्री वडीगोद्री (ता. अंबड) येथील रस्त्यावर ट्रकची गती कमी होताच दोघे चोरटे ट ट्रकवर चढले. ट्रकच्या केबीनवरुन त्यांनी चालकाच्या काचेसमोर टारपोलीन सोडल्याने ट्रक चालकास रस्ता न दिसल्याने ट्रक थांबवला. ट्रक थांबताच चौघांनी ट्रकच्या चालकास धारदार शस्त्राचा धाक दाखवून मारहाण केली आणि त्याचे हातपाय बांधून त्यास रस्त्याच्या बाजूस सोडून दिले. त्यानंतर चौघे ट्रकसह चालकाजवळील १५ हजार रुपये व चालकाचा भ्रमणध्वनी घेऊन पसार झाले होते. ट्रक पहाटे ४ वाजेच्या सुमारास शिंगोली शिवारातील राष्ट्रीय महामार्गावर उस्मानाबादकडे जात असल्याचे आनंदनगर पोलिस ठाण्याचे पोना गंगावणे, गोबाडे यांना दिसताच त्यांनी ट्रकचा पाठलाग करुन थांबवून ट्रकचालक अनिल सुरेश मंजुळे (रा. शिंदेवाडी-सारोळा) यास लुटीनंतर अवघ्या ४ तासात ताब्यात घेतले. जालना पोलिसांना कळवले असून नमूद आरोपीसह ट्रक जालना पोलिसांच्या स्वाधीन केला जाणार आहे. धारदार शस्त्र अवैधपणे बाळगून शस्त्र कायदा कलमचे उल्लंघन केल्याबद्दल चालकाविरुद्ध आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा झाला.


 
Top