उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

जिल्ह्यात  सध्या मोठ्या संख्येने वृक्ष लागवड होत आहे आणि काही गावात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. यामागे गावकऱ्यांचा सहभाग हाच या यशाचा आधारस्तंभ असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी म्हटले आहे.

 वाशी तालुक्यातील पारगाव,दहिफळ,यशवंडी,तेरखेडा,सरमकुंडी तसेच उस्मानाबाद तालुक्यातील आळणी या गावांना भेट देऊन वृक्ष लागवडीची व नियोजनाची पाहणी केली. हजारोंच्या संख्येने वृक्ष लागवड होण्यामागे जिल्हा प्रशासनाबरोबर मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा सहभाग आहे. ही बाब अत्यंत महत्वाची व आशादायी असणारी आहे. असे फड म्हणाले.

 प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच सुजाण नागरिक यावेळी उपस्थित होते.नागरिकांनी आम्ही लावू तेवढे वृक्ष जगवू असे म्हटले.लोकसंख्येच्या तीन पट वृक्ष लावून जगवण्याची हमीही नागरिकांनी दिली. काही गावात डॉ. फड यांनी धार्मिक सप्ताहात किर्तनाव्दारे नागरिकांना विविध विषयावर मार्गदर्शन करावे असेही नागरिकांनी म्हटले.फड यांनी कोरोना समाप्तीनंतर निश्चितच कीर्तन, प्रवचन, प्रबोधन करू असे आश्वासन दिले. फड यांच्यासोबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे, गटविकास अधिकारी श्री. खिल्लारे, श्रीमती समृद्धी दीवाने, जिल्हा आरोग्य अधिकारी हनुमंत वडगावे तसेच तालुका आरोग्य अधिकारी, उप अभियंता, ग्रामसेवक, सरपंच उपसरपंच आदी उपस्थित होते.


 
Top