उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव सिद्धेश्वर गावातील मोठ्या पाझर तलाव क्रमांक १ व पाझर तलाव क्रमांक २ तलावाची दुरवस्था झाली असून तो धोकादायक झाला असल्याने भविष्यात दुर्दैवी दुर्घटना घडू नये याकरता तलावाची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामपंचायत,लोकप्रतिनिधी,गावकरी,शेतकरी गेली सहा वर्षे करत असून याचे वेळोवेळी निवेदन देखील दिलेले होते यामुळे खासदार ओम राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या प्रयत्नामुळे पाझर तलाव क्र. २ या तलावास मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेंतर्गत रु २६ लक्ष निधी मंजूर झाला असून सदर तलावाच्या प्रशासकीय मान्यतेसाठी महाराष्ट्र शासनाकडून जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्याकडे प्रस्तावित केला होता; परंतु जिल्हा परिषदेकडून एकमेव वडगाव (सि.) पाझर तलाव क्र.२ चा निधी मंजूरीचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेतुन वगळण्यात आला असल्याने यावर्षीदेखील पाझर तलाव धोकादायक स्थितीमध्ये असल्याने गावकऱ्यांमध्ये व शेतकऱ्यामध्ये तलाव फुटन्याची शक्यता तसेच तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.  

वडगाव सिद्धेश्वर गावच्या वरच्या बाजूला साधारण ४० वर्षापूर्वी बांधलेले या पाझर तलावाचे आजपर्यंत कसल्याही प्रकारे डागडुजी व दुरुस्ती झालेली नाही पाझर तलावाच्या भरावावर मोठी झाडे वाढली आहेत झाडांची मुळे खोलवर जाऊन भराव कमकुवत झालेला आहे दगड व खालील माती मोकळी होत आहे तसेच काही ठिकाणी भरावला चिरा देखील गेलेले आहेत.रोजगार हमी योजनेतून झालेल्या पाझर तलावाला गळती लागल्याने दरवर्षी पावसाळ्यात सुटणारे लाखो लिटर पाणी वाया जात आहे गेल्या अनेक वर्षापासून तलावाच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडे निधी आहे परंतु दोन्ही तळ्याचे हस्तांतरण गत सहा वर्षांपासून न झाल्यामुळे उपविभागीय जलसंधारण अधिकारी जिल्हापरिषद (ल.पा) उस्मानाबाद व उपविभागीय अभियंता लघु पाटबंधारे उस्मानाबाद यांचा स्वतंत्र निधी मिळालेच नाही यामुळे तलावाच्या दुरुस्तीच्या प्रश्नाकडे लक्ष कोण देणार हाच खरा प्रश्न आहे.

जिल्ह्यात गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसाने दोन्ही पाझर तलाव पूर्णपणे भरले होते तसेच सांडव्याला मोठा खंदक असल्याने फोडणेही कठीण जात होते त्यामुळे पाणी भरावावरुन ओसंडून वाहत असल्याने धोका अधिकच वाढला होता परंतु सांडवा फोडल्याने पाण्याचा विसर्ग सांडव्यातुन वाढवल्याने यावर्षीचा धोका टळला परंतु अतिवृष्टीमुळे पाझर तलावाचा भराव खचला असल्याने व भरावावर मोठ मोठे झाडे उगवल्याने भराव कमकुवत झालेला आहे.वडगावच्या माजी सरपंच अंकिता अंकुश मोरे,पंचायत समिती सदस्य गजेंद्र राजेंद्र जाधव,अंकुश मोरे,सरपंच बळीराम कांबळे,उपसरपंच जयराम मोरे,सुरेश मुळे,अनिल निकम,प्रमोद चादरे शेतकरी ग्रामस्थ यांनी वेळोवेळी उपविभागीय जलसंधारण अधिकारी जिल्हापरिषद (ल.पा) उस्मानाबाद व उपविभागीय अभियंता लघु पाटबंधारे उस्मानाबाद यांच्याकडे दुरुस्तीसाठी पाठपुरावा देखील केलेला आहे परंतु दोन्ही विभागाच्या हस्तांतरणाच्या भूमिकेमुळे ६ वर्षांपासून दुरुस्ती कोणी करायचे हे प्रलंबितच आहे तर पाझर तलाव क्रमांक २ ला निधी उपलब्ध झालेला असताना राजकीय सूडबुद्दीने फक्त वडगाव पाझर तलाव प्रशासकीय मान्यतेतुन वगळला असून ६ वर्षांपासून हस्तांतरण देखील हळू शकले नाही याबाबत गावकऱ्यामध्ये व शेतकऱ्यामध्ये बोलले जात आहे.

 उपविभाग अभियंता लघु पाटबंधारे उपविभाग उस्मानाबाद यांचे लेखी स्वरूपात धक्कादायक उत्तर -

उपविभाग अभियंता लघु पाटबंधारे उपविभाग उस्मानाबाद यानी कार्यकारी अभियंता उस्मानाबाद लघु पाटबंधारे विभाग उस्मानाबाद यांच्या हस्तांतरण दिनांक २९/०५/२००७ च्या पत्रानुसार पाझर तलावाच्या हस्तांतरण करण्यासाठी वारंवार जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहारदेखील केलेला आहे परंतु जिल्हापरिषदेच्या उदासिन कार्यभारामुळे आजपर्यंत तलाव हस्तांतरित झालेले नाहीत त्यामुळे सर्व पाझर तलावाची धोकादायक असुन हे पाझर तलाव येणाऱ्या पावसाळ्यात फुटण्याची शक्यता नाकारता येवु शकत नाही असा अहवाल देखील वेळोवेळी पत्रव्यवहारातून कळवला असुन सदर पाझर तलाव पावसाळ्यात फुटल्यास सर्वस्वी जबाबदारी जिल्हा परिषदेची राहिल असा लेखी अहवाल देखील कळवलेला असुन देखील हस्तांतरण प्रकियेला नेमका विलंब कशाचा लागतोय आणि कागदे घोडे नाचवत कशाला आहेत हेच आश्चर्यकारक आहे.

गजेंद्र राजेंद्र जाधव - पंचायत समिती सदस्य

उपविभागीय जलसंधारण अधिकारी जिल्हापरिषद (ल.पा) व उपविभाग अभियंता लघु पाटबंधारे उपविभाग उस्मानाबाद यांच्याकडे गत सहा वर्षांपासून वडगाव येथील पाझर तलाव हस्तांतरण करून घेण्यासाठी पाठपुरावा करत आहोत परंतु वेळोवेळी कागदे घोडे नाचवून दोन्ही विभाग वेळकाढूपणा करत आहेत सद्यस्थितीत दोन्ही पाझर तलावाची दुरुस्ती झाली नाही तर भराव फुटल्यास आजुबाजूच्या कृषीक्षेत्राची तसेच वडगाव (सि.) मध्ये पाणी शिरुन जीवित व वित्त हानी होण्याचा संभाव्य धोका असल्याने भविष्यात होणाऱ्या दुर्घटनेस जबाबदार धरू.


 
Top