उस्मानाबाद/ प्रतिनिधी

जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयास ६ बोलेरो आणि ७६ दुचाकी पेट्रोलिंग वाहने उपलब्ध झाली असून, सोमवारी सकाळी या वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते पोलिस कवायत मैदानावर पार पडले.त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून या वाहनांनी सायरन वाजवत रॅली काढली. एका रांगेत निघालेल्या या वाहनांनी शहरवासियांचे लक्ष वेधले.

पालकमंत्री गडाख म्हणाले, पोलिसांना वाहनांसारखी साधन सामग्री उपलब्ध करून त्यांच्या क्षमता संवर्धनात वाढ केली जात आहे. यातून जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यास व महिला तसेच संकटात सापडलेल्या नागरिकांना मदतीसाठी या वाहनांचा नक्कीच उपयोग होईल. पालकमंत्री गडाख यांच्या हस्ते या वाहनांना हिरवी झेंडी दाखवून या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जि.प.च्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, आमदार विक्रम काळे, ज्ञानराज चौगुले, कैलास पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी डॉ. विजयकुमार फड, पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन, अपर पोलिस अधीक्षक पालवे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलिस अधीक्षक रौशन यांनी केले.

 
Top