उस्मानाबाद / प्रतिनिधी- - 

कोरोनामुळे गेल्या दीड महिन्यांपासून जिल्ह्यात लाॅकडाऊन सह कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. बाजारपेठे सोबतच जनावरांचा आठवडी बाजार बंद आहे उस्मानाबाद येथे दर गुरुवारी जनावरांचा आठवडी बाजार सुध्दा बंद आहे. यामुळे पशुधन खरेदी विक्री बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांची शेती मशागतीचे कामे खोळंबली आहेत.

खरीब हंगाम तोंडावर आला असून शेतातील कामांची लगबग वाढलेली दिसत आहे. अनेक शेतकरी शेतीचे कामे ट्रक्टर किरायाने लावून करून घेत आहेत. सध्या डिझेल चे भाव वाढल्याने ट्रॅक्टर द्वारे मशागतीचा खर्च वाढला आहे.  सध्या लाॅकडाऊनमुळे बैलजोड्यांची खरेदी विक्री बंद असल्याने शेतकऱ्यांची खरेदी रखडली आहे पुढील महिन्यात खरीप हंगाम सुरू होत असल्याने हंगामापूर्वी मशागतीच्या कामासाठी बैलांची मोठी गरज असते यासाठी शेतकरी गुढीपाडव्यानंतर बैलजोड्या खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू करतात. यंदा गेल्या दीड महिन्यांपासून जिल्ह्यात लाॅकडाऊन सुरू असल्याने सर्व प्रकारच्या बाजार बंद आहेत त्यांचा फटका जनावरांच्या बाजाराला बसला आहे बैलांची आवश्यकता असलेले शेतकरी बाजारपेठेच उपलब्ध नसल्याने वैयक्तिक स्तरावर कोणी बैल विकणारे आहेत काय  त्याचा शोध घेत आहेत चांगल्या दर्जाचे नामवंत जातीचे बैल सहजपणे मिळणे कठीण झाले आहे.

उस्मानाबाद शहरातील आठवडी बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांच्या दावणीचे पशुधन खरेदी विक्री करण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे कोणाला पशुधन विकून बी बियाणे खरेदी करायची आहेत तर कोणाला बैल पशुधन खरेदी करून शेती मशागतीची कामे वेळेत पूर्ण करायची आहेत. खरीप हंगाम अगदी तोंडावर आल्याने आठवडी बाजार बंद असल्याने पूर्ण मशागतीची कामे ठप्प झाली आहेत. 

कर्जाचा बोजा वाढणार?

पशुधन विक्री करून शेतकरी मुला मुलींची लग्न करतात. मर्यादित लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ पार पडत असली तरी. लग्नातील रुखवत भांडी याचा खर्च मुलीच्या वडीलांना आहे. तो खर्च भागवण्यासाठी शेळी, म्हैस, गाय आदींची विक्री करून गरज भागवली जाते. मात्र बाजारच बंद असल्याने तो पर्याय उरला नाही. परिणामी सावकारी कर्ज काढण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शेतकरी पशुपालकांच्या डोक्यावर पुन्हा कर्जाचा डोंगर वाढणार आहे.

 
Top