कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती महिलेचे सिझर केले यशस्वी

उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

जिल्हयातील कोरोना बांधित गर्भवती महिलांची विलगीकरणांची व्यवस्था शहरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात करण्यात आली आहे.येथेच अशा महिलांच्या प्रसुतीचीही व्यवस्था करण्यात आली आहे.या आयुर्वेदिक महाविद्यालयातील विलगीकरण केंद्रात कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती महिलांचे सिझर प्रसुती तसेच नियमानुसार गर्भपात करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.याच केंद्रात काल येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ.स्मिता सरोदे-गवळी यांच्या नेतृत्वाखाली कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर यशस्वीपणे सिझर करून प्रसुती करण्यात आली.कोरोना काळात 57 कोरोना बांधित गर्भवती महिलांपैकी काही महिलांची  प्रसुती करण्याचे आणि उर्वरित महिलांना  योग्य स्वरूपात वैद्यकीय सुविधा देण्याचे काम येथील स्त्री रुग्णालयातील डॉक्टरांनी जिकिरीने पार पाडले आहे,अशीही माहिती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.स्मिता सरोदे-गवळी यांनी आज येथे दिली.

येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात एक गर्भवती महिला प्रसुतीसाठी काल (दि.18) दाखल झाली होती. या महिलेची रॅपिड ॲन्टीजन चाचणी केली असता ती कोरोना पॉझिटिव्ह आली.त्यामुळे या महिलेस शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या येथील कोरोन विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले. या महिलेच्या सर्व तपासण्या केल्या असता तिची नैसर्गिक प्रसुती करणे शक्य नसल्याचे निर्देशनास आले.त्यामुळे डॉक्टरांनी या महिलेची सिझर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.डॉ.सरोदे –गवळी यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या पथकाने अतिशय जोखमेची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.या कोरोना बांधित महिलेने तीन किलो वजन असलेल्या गोडस मुलास जन्म दिला आहे. या बाळांची आरटीपीसीआर ही कोरोना चाचणी करण्यात आली असून अहवाल प्रलंबीत आहे. सध्या या महिलेची व बाळांची प्रकृती चांगली आहे.या महिलेची यापूर्वी दोन वेळा प्रसुतीसाठी सिझर शस्त्रक्रिया करून झाल्या होत्या.त्यामुळे यावेळची सिझर शस्त्रक्रिया अतिशय जोखमीची होती,अशीही माहिती डॉ.सरोदे-गवळी यांनी दिली आहे.

या महिलेची सिझर शस्त्रक्रिया करताना कोरोना संबंधी नियामांचे पूर्ण पालन करण्यात आहे.या सिझर शस्त्रक्रियेसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय पाटील, कोरोना नोडल अधिकारी डॉ. मुल्ला यांचे मार्गदर्शन लाभले.शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. खापर्डे , स्त्री रोग विभाग प्रमुख डॉ. विना पाटील, डॉ.खोत, डॉ.आगवणे आणि निवासी डॉक्टरांनी सहकार्य केले.या महिलेची सिझर शस्त्रक्रिया डॉ. स्मिता सरोदे-गवळी, डॉ.सुधीर सोनटक्के,डॉ.रेखा टिके, डॉ.मुकुंद माने, डॉ.मुकेश,डॉ.आगवणे,डॉ. दिशा केसूर, डॉ.अश्विनी पाटील, डॉ.श्रध्दा तथा परिचारिका श्रीमती दाणे आदीनी यशस्वी केली.

जिल्हयातील  कोरोना बांधित गर्भवती महिलांवर उपचार

कोरोना महामारीच्या काळातही येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील डॉक्टरांनी कोरोना बांधित 57 गर्भवती महिलांवर यशस्वीपणे उपचार करण्याचे काम केले आहे. कोरोना बांधित गर्भवती महिलासाठी येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात स्थापन केलेल्या विलगीकरण कक्षात कोरोनाच्या पहिल्या टप्यात दोन कोरोना बांधित महिलांची सिझर शस्त्रक्रिया यशस्वी करण्याबरोबरच नियमानुसार गर्भपात करण्याचे कामही येथील डॉक्टरांनी जिकिरीने पार पाडले आहे. या काळात जिल्हा स्त्री रुग्णालयातील डॉक्टरांनी 16 गर्भवती कोरोना बांधित महिलांच्या नैसर्गिक स्वरूपात प्रसुतीही केल्या आहेत. उर्वरित प्रसुतीस पात्र नसलेल्या पण गर्भवती कोरोना पॉझिटिव्ह महिलावर योग्य प्रकारे उपचार करून त्यांची आणि त्यांच्या बाळांची योग्य योग्य प्रकारे  काळजी घेत उपचारही करण्यात आले आहेत,अशी माहिती डॉ.स्मिता सरोदे-गवळी यांनी दिली आहे.


 
Top