उस्मानाबाद / प्रतिनिधी-

ग्रामविकास विभागामार्फत राज्यात महाआवास अभियान राबविण्यात येत आहे.या अंतर्गत राज्यातील तीन लाख 22 हजार 229 घरकुलांची कामे पूर्ण होऊन मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई येथे प्रातिनिधिक स्वरूपात पाच कुटुंबांना घरकूलाची चावी देऊन इतर सर्व कुटुंबांना ई-गृहप्रवेश कार्यक्रम ऑनलाईन पार पडला.

उस्मानाबाद जिल्ह्यात महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या 1453  मंजूर घरकूलापैकी  728  घरकूलांचे काम पूर्ण झाले आहे. राज्य पुरस्कृत आवास योजनेच्या 8970 मंजूर घरकूलापैकी 834 घरकुलांचे कामे पूर्ण झाली आहेत.  मंगळवारी सर्व पंचायत समिती, ग्रामपंचायत व जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद कार्यालयाच्या व्ही.सी. हॉल मध्ये एकूण 1562 घरकूलांच्या चाव्या देण्यात आल्या.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती अस्मिता कांबळे यांनी केंद्र व राज्य पुरस्कृत योजने अंतर्गत बांधण्यात आलेल्या प्रत्येक घरकूल परिसरात किमान पाच झाडे लावून सर्व घरकूले पूर्णतः वृक्षांकित करावीत.जेणेकरून पर्यावरणास मदत होईल असे आवाहन सर्व घरकूल लाभधारकांना केले.

 यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री.अनिलकुमार नवाळे,पंचायत समिती उस्मानाबाद सभापती श्रीमती हेमाताई चांदणे, उपसभापती श्री.आशिष नायकल यांच्या हस्ते पाच लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात घरकूलाची चावी व एक वृक्षाचे रोप  देण्यात येऊन त्यांचे घरकूलाचे स्वप्न पूर्ण करण्यात आले.यावेळी पंचायत समिती उस्मानाबादच्या गटविकास अधिकारी श्रीमती समृद्धी दिवाणे,सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेश तायडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे जिल्हा प्रोग्रामर श्री.मेघराज पवार आणि इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

 
Top