बेंबळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी करणारे पाच चोरटे पकडले
एलसीबी, दंगल नियंत्रक पथकाचे जुनोनीला कोम्बिंग ऑपरेशन


उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

तालुक्यातील बेंबळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी करणारे पाच चोरटे स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस मुख्यालयातील दंगल नियंत्रक पथकाने जुनोनी येथे कोंम्बिंग ऑपरेशन करून मंगळवारी मध्यरात्री पकडले. मध्यरात्रीनंतर तीन वाजेपासून सकाळी सातवाजेपर्यंत चार तास ही कारवाई करण्यात आली.

पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक गजानन घाडगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज निलंगेकर, पोलिस उपनिरिक्षक पांडुरंग माने, भुजबळ, हवालदार काझी,  शेळके, महेश घुगे, हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, टेळे,  अशोक ढगारे, पांडुरंग सावंत, सर्जे, कोळी, अविनाश मरलापल्ले, आरसेवाड, ठाकूर, होळकर यांसह पोलिस मुख्यालयातील दंगा काबू पथकाने  जुनोनी शिवारात कोम्बिंग ऑपरेशन केले. यावेळी बाळू शहाजी शिंदे, करण दिलीप भोसले, इंदुबाई दिलीप भोसले (तीघे रा. जुनोनी), विजय बाबलींग्या भोसले (रा. झरेगाव, ता. बार्शी) व एक अल्पवयिन मुलाला पकडले. यांच्या ताब्यात तीन मोटारसायकल, विविध कंपन्यांचे १९ मोबाईल, एक तोळ्याचे सुवर्ण दागिने व १५ हजार रोख रक्कम आढळली. सर्व मुद्देमाल जप्त करून याचा शाेध घेतला असता बेंबळी पोलिस ठाण्यात झालेल्या चोरीप्रकरणी दोन गुन्हे दाखल झालेले आढळले. यातील  मुद्देमाल असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. २०२१ व २०११ मध्ये हे गुन्हे दाखल झाल्याचे सांगण्यात आले. यासोबतच उस्मानाबाद (शहर) दोन, ढोकी, उस्मानाबाद (ग्रामिण), सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई ठाणे हद्दीतून याची चोरी झाल्याचे आढळून आले. तेथेही गुन्हे  दाखल झाले आहेत. या सर्व गुन्ह्यातील हा मुद्देमाल आहे.

 
Top