मुरुम / प्रतिनिधी

कोरोना सारख्या महामारीमध्ये मागील वर्षभरापासून इतर फ्रन्टलाइन वर्कर प्रमाणेच स्वतःचा जीव धोक्यात घालून सातत्याने वृत्तपत्र व टीव्ही मीडियाच्या माध्यमातून बातम्या पोहोचविण्याचे व जनजागृतीचे काम अथकपणे सर्व पत्रकार करीत आहेत. त्यांच्या विविध समस्या बाबत शासन उदासीन असून पत्रकारांना सातत्याने दुय्यम दर्जा दिला जात आहे. महाराष्ट्र पत्रकार संघाच्या ऑनलाइन बैठकीत याबाबत संस्थापक अध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी आक्रमक भूमिका घेत याबाबत महाराष्ट्रभर निवेदने देण्याचे आवाहन केले आहे.

यामध्ये महाराष्ट्रातील सर्व वयोगटातील पत्रकारांना तातडीने कोरोना प्रतिबंधक लस त्वरित द्यावी, पत्रकारांसाठी ऑक्सीजन आणि व्हेटीलेटरची सोय असलेले बेड प्रत्येक जिल्हयात राखीव ठेवावेत, पत्रकारांना फ्रन्टलाईन वर्कर चा दर्जा द्यावा, कोरोनाने बळी गेलेल्या पत्रकारांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत तातडीने दयावी, सर्व विभागातील माहिती कार्यलयासह गतवर्षापासून वर्तमानपत्रांची थकीत राहिलेली देयके ताबडतोब देण्याचे आदेश काढावेत, अधिस्वीकृती धारकच पत्रकार नव्हे तर सर्वच पत्रकारांना वृतसंकलनाकरिता परवानगी दयावी आणि प्रवासी टोलमधून सवलत दयावी. 

गेल्या मार्चपासून राज्यात सुमारे ५०२४ पत्रकार कोरोनाबाधित झाले असून १३९ पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. उपचार व व्यवस्था न झाल्यामुळे अनेकजन दगावत आहेत. यामुळे पत्रकारांमध्ये भिती व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाकडे सरकारचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याची भावना तमाम पत्रकारांमध्ये आहे. अनेक पत्रकारांना तर कुटूंबाचा गाडा चालवणे मुश्किल झाले आहे. अनेक पत्रकार बांधव संकटात सापडले असून उदरनिर्वाह करणे ही कठीण झाले आहे. अशा काळात पत्रकारांना दिलासा मिळेल असा एकही निर्णय सरकारने घेतलेला नाही. तेव्हा सरकारला तातडीने जागे करण्यासाठी महाराष्ट्रभर महाराष्ट्र पत्रकार संघ व अन्य संघटनांच्या माध्यमातून निवेदने दिली जाणार आहेत.

या ऑनलाईन बैठकीत उस्मानाबाद जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.महेश मोटे, उपाध्यक्ष अमोल पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष सुधाकर पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष प्रा . किरण जाधव, नांदेड जिल्हाध्यक्ष नामदेव यलकटवार, नागपूर जिल्हाध्यक्ष गजेंद्रसिंह लोहिया, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा.संजय शेळके, बीड जिल्हाध्यक्ष बापूसाहेब हुंबरे, सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत बाविस्कर, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जगदीश कदम, मुंबई उपनगर जिल्हाध्यक्ष अनुज केसरकर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुरेश रामगुंडे, लातूर जिल्हाध्यक्ष विठ्ठल तगलपल्लेवर यांच्यासह अनेक जिल्हाध्यक्ष व राज्य पदाधिकारी या ऑनलाइन बैठकीत उपस्थित होते.

 
Top