मे अखेर प्रकल्प सुरु करण्याची अ‍ॅड. गुंड यांची माहिती


उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

राज्यातील साखर कारखान्यामध्ये इथेनॉल प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मित्ती प्रकल्प उभारण्यास शासनाकडून मंजुरी देण्यात येत आहे. त्यानुसार उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी (आ.) येथील रुपामाता नॅचरल शुगर कारखान्यास शासनाकडून शुक्रवारी (दि.7) मंजुरी मिळाली आहे. याबाबत कारखान्याचे चेअरमन अ‍ॅड. व्यंकटराव गुंड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रकल्प उभारणीचे काम वेगाने सुरु आहे. याठिकाणी प्रतिदिन दोन टन ऑक्सिजन निर्मिती होणार असून मे अखेरपर्यंत रुग्णांना ऑक्सिजन सेवा देण्यात येईल, असे त्यांनी दैनिक लोकराज्यशी बोलताना सांगितले.

सध्या कोविडच्या दुसर्‍या लाटेमुळे राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोविड रूग्णांना ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागलेली आहे. राज्यात दररोज हजारो रुग्ण आढळत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा फार मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे पाडोळी येथील रुपामाता नॅचरल शुगर कारखान्यास हा प्रकल्प उभारणीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. वाढत्या ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी रुपामाता कारखान्याचे चेअरमन अ‍ॅड व्यंकटराव गुंड यांनी पुढाकार घेऊन या ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प कार्यरत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या प्रकल्पास शासनाकडून मंजुरी मिळाल्यामुळे याठिकाणी आता प्रतिदिन दोन टन (शंभर सिलेंडर) ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. जिल्ह्यातील भासणारा ऑक्सिजन तुटवडा यास अ‍ॅड. गुंड यांच्या माध्यमातून हातभार लागणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे कोरोना काळातील वाढत्या रुग्णास मोठा हातभार लागणार आहे.

सामाजिक उपक्रमात रुपामाता उद्योग समूह सतत अग्रेसर असतो. कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी रुपामाता कारखान्याच्या वतीने जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याने नुकतेच 5 ऑक्सिजन सिलेंडर मंडळ अधिकारी श्री.कोळी, तलाठी लाकाळ यांच्या मार्फत जिल्हा शासकीय रुग्णालयास सुर्पूद केले होते. आता कारखान्यास ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यास मंजुरी मिळाल्यामुळे प्रतिदिन दोन टन ऑक्सिजन निर्मिती होवून वाढत्या कोरोना रुग्णांसाठी दिलासा मिळणार आहे. सध्या कारखान्यावर हा प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक त्या तांत्रिक बाबीची जुळवाजुळव सुरु असून तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली कामकाज सुरु आहे. त्यामुळे मे अखेरपर्यंत हे काम पुर्ण होईल, असा विश्वासही अ‍ॅड. व्यंकटराव गुंड यांनी व्यक्त केला आहे.

 
Top