उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

कोरोनाच्या साथीने कहर केला आहे. प्रचंड प्रमाणात लोकांना लागण होत आहे. सरकार, डॉक्टर्स, रुग्णालयातील स्टाफ हे आटोकाट मेहनत करत आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्रातील ४५००० डॉक्टर्स अहोरात्र रूग्णालयात काम करीत आहेत. गेल्या एक ते दिड वर्षापासून हा मानवतेचा वसा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टर्सनी हाती घेतला आहे. आपले सर्वस्व पणाला लावून, आपला जीव धोक्यात टाकून आणि आपल्या कुटुंबातील सर्वांपासून वेगळे राहून हे आव्हान डॉक्टर्स पेलत आहेत.त्यामुळेच रेमडेसिविर किवा ऑक्सिजन किंवा तत्सम अत्यावश्यक गोष्टी रूग्णालयांना वेळेवर आणि योग्य प्रमाणात पुरवल्या पाहिजेत. रेमडेसिविर किवा ऑक्सिजन किंवा तत्सम अत्यावश्यक गोष्टींचा तुटवडा असल्याचा आणि पुरवठा नसल्याचा दोष रूग्णालयांवर न देता सत्य परिस्थिती जनतेने लक्षात घेणे आवश्यक आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने याबाबत दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की,  काही महत्वपूर्ण गोष्टी सर्वांना माहित होणे आवश्यक झाले आहे. लोकांनी न घाबरता काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. आपल्याला कुठलेही लक्षण दिसल्यास त्वरीत तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोरोनाची चाचणी वेळेवर आणि लवकर करा. आजार अंगावर काढू नका. ऐकिवात असलेल्या बातम्यांवर विसंबून स्वतः उपचार करू नका. कुठल्याही शंका असल्यास इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांना संपर्क करा. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका. डॉक्टरांनी रूग्णालयात दाखल व्हायला सांगितल्यास त्वरीत दाखल व्हा. वेळ वाया घालवू नका. लवकर उपचार करणे खूप फायदेशीर आहे हे लक्षात ठेवा. आपल्यासोबत इतरांची देखील काळजी घ्या. मास्क, गर्दी न करणे, गर्दीत न जाणे, स्वच्छता इ. या साध्या गोष्टी तंतोतंत पाळा. पण घाबरू नका. इंडियन मेडिकल असोसिएशन तुम्हा सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आम्ही या लढाईत राज्य सरकारसोबत खांद्याला खांदा लावून उभे आहोत. आज ८०% रूग्णसेवा इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर्स देत आहेत.

कोरोनाच्या रूग्णांचे उपचार करतांना ऑक्सिजन, रेमडेसिविर, टोसिलीझुमाब, पीपीई इ. गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण आहेत. सध्या रेमडेसिविरचा अत्यंत तुटवडा सर्वत्र जाणवत आहे. रूग्णालयांना, डॉक्टरांना रेमडेसिविरचा पुरवठा अत्यल्प प्रमाणात होतो आहे. ऑक्सिजन चा पुरवठा देखील अत्यंत अनियमित आणि कमी होतो आहे. ऑक्सिजनचे दर तिपटीपेक्षा जास्त झाले आहेत.

रूग्णालयात रेमडेसिविर हे सरकारने अधिकाऱ्यांमार्फत द्यायची घोषणा केली. आणि रूग्णांच्या नातेवाईकांना लिहून देण्यात येऊ नये असे देखील सांगितले. पण प्रत्यक्षात रेमडेसिविरचा पुरवठाच होत  नसेल तर रूग्णालय हे इंजेक्शन्स आणणार कुठून? त्यामुळे हा अत्यंत गहन प्रश्न निर्माण झाला आहे.  ऑक्सिजनच्या बाबतीत तेच घडत आहे. पुरवठादार ऑक्सिजनचा पुरवठा वेळेवर आणि आवश्यक तेवढा करत नाहीत. असे असतांना रूग्णालय ऑक्सिजन कुठून आणणार?

त्यामुळेच रेमडेसिविर किवा ऑक्सिजन किंवा तत्सम अत्यावश्यक गोष्टी रूग्णालयांना वेळेवर आणि योग्य प्रमाणात पुरवल्या पाहिजेत. तुटवडा असल्याचा आणि पुरवठा नसल्याचा दोष रूग्णालयांवर न देता सत्य परिस्थिती जनतेने लक्षात घेणे आवश्यक आहे. या साथीच्या आजारात प्राण वाचविण्यासाठी डॉक्टर रात्रंदिवस झटत आहेत. अनेक डॉक्टर्स देखील कोरोनाच्या साथीदरम्यान काम करताना मृत्यूमुखी पडले आहेत. ऑक्सिजन आणि औषधांच्या कमतरतेमुळे डॉक्टरांना त्यांचे रुग्ण आणि त्यांचे स्वतःचे सहकारी मृत्यूमुखी पडतांना पहायला लागणे हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर प्रचंड ताण पडत आहे.या भयावह परिस्थितीत न घाबरता योग्य आणि अत्यावश्यक उपचार डॉक्टर्स करत आहेत. डॉक्टर्स आपले कर्तव्य बजावत असताना मात्र प्रशासनाकडून आवश्यक अशा औषधांचा, ऑक्सिजनचा अखंड आणि सुनिश्चित पुरवठा न होणे, या आवश्यक गोष्टींचे नियोजन नसणे हे दुर्दैवी आहे. आणि या सर्व  अत्यावश्यक गोष्टी उपलब्ध करण्याची जबाबदारी रूग्णालयांवर ढकलून देणे हे अतिशय चुकीचे आहे. हे असेच चालू राहिल्यास राज्यातील सर्व जिल्ह्यातील, गावांतील रूग्णालयांना आणि डॉक्टरांना काम करणे अशक्य होणार आहे. सरकारने या वस्तुस्थितीवर त्वरित पावले उचलणे क्रमप्राप्त ठरेल.

आताच्या भयावह परिस्थितीत रूग्णालये आणि डॉक्टरांच्या सहनशीलतेने परिसिमा गाठली आहे. सरकारने या अत्यावश्यक गोष्टी रूग्णालयांना पुरवाव्या. आम्ही रूग्णांना उपचार देण्याचा वसा कधीही सोडणार नाही. इंडियन मेडिकल असोसिएशन राज्याच्या जनतेसाठी अहोरात्र लढेल  असे आश्वासन प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिले आहे. या पत्रकावर डाॅ.रामकृष्ण लोंढे, डॉ. पंकज बंदर कर, डाॅ.सुहास पिंगळे, डाॅ.जयेश लेले, डॉ. अशोक आढाव, डॉ.शिवकुमार उत्तुरे, डाॅ.रवींद्र वानखेडकर, डाॅ.मंगेश पाटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

 
Top