जिल्हा शासकीय रुग्णालयात जबाबदार कोण ? आता तरी कारवाई करणार का ?


उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुगणालयाचा गलथान,ढिसाळ व भावना शून्य कारभार उघड झाला आहे. उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली या गावातील एका 70 वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना दोनदा देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या महिलेचा मृत्यू 4 मे रोजी झाला होता त्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांना 5 मे रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयाने रीतसर प्रक्रिया करून दिला त्यांनतर नातेवाईकांनी 5 मे रोजी त्यांच्यावर वाघोली येथे विधिवत अंत्यसंस्कार केले व आज 7 मे रोजी त्या आजीचे तिसऱ्या दिवशी राख सावडण्याचा विधी करून नातेवाईक घरी येऊन टेकत नाही तोच पुन्हा एकदा जिल्हा शासकीय रुग्णालयातुन त्या वृद्ध आजीचा मृतदेह घेऊन जा असा फोन आल्यावर नातेवाईकांच्या पायाखालची जमीन सरकली. जिल्हा शासकीय रुग्णालयात झालेल्या या प्रकाराला जबाबदार कोण ? आता तरी जिल्हाधिकारी , जिल्हा शल्य चिकित्सक कारवाई करणार? की या गंभीर प्रकारावर पांघरुण टाकणार ? हा प्रश्न समोर आला आहे. जिल्ह्यात कोरोना व सारीचे थैमान असून मृत्यु झालेल्या रुग्णांचे व अंत्यसंस्कार केलेल्या रुग्णांचे आकडे यापूर्वीच जुळेना झालेत त्यात असा प्रकार घडल्याने संशयाला जागा मिळत आहे त्यामुळे या प्रकाराची स्वतंत्रपणे चौकशी करण्याची मागणी नातेवाईक यांनी केली आहे दरम्यान आमदार लोकप्रतिनिधी या कारभारावर काय भूमिका घेतात याकडेही लक्ष लागले आहे. आज नातेवाईक यांना देण्यात आलेला मृतदेह हे त्याचं आजीचा होता व तो मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. 

उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली गावातील द्वारकाबाई रामचंद्र खडके या महिलेला 4 मे रोजी उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले व त्याच दिवशी  उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला व त्यांनतर 5 मे रोजी सकाळी 10 ते 11 च्या दरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयाने एका बंद पीपीई मृतदेह किटमध्ये मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला त्यावेळी त्यावर द्वारकाबाई यांचे नाव गाव व इतर माहिती एका कागदावर चिटकविण्यात आली. आजीवर कोरोना वॉर्डात उपचार करण्यात आले व त्याच वॉर्डात त्यांचा मृत्यू झाल्याने नातेवाईक यांनी ती किट न उघडता विधिवत अंत्यसंस्कार 5 मे रोजी केले व आज तिसऱ्या दिवशी राख सावडण्याचा विधी करून घरी येत नाही तोच द्वारकाबाई यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात आहे तो घेऊन जा ? असा फोन नातेवाईकांना आला त्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली व मृतदेहाचा फोटो विडिओ मागितला तर तो त्या आजीचाच निघाला व त्यानंतर नातेवाईक जिल्हा रुग्णालयात आले व तो मृतदेह द्वारकाबाई यांचा असल्याची खात्री करून ताब्यात घेतला,आता उस्मानाबाद नगर परिषद या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार आहे.

दरम्यान द्वारकाबाई यांचा मृत्यू कोरोना की सारी यापैकी कशाने झाला हे अजून स्पष्ट झाले नाही, त्यांचा रॅपिड अहवाल निगेटिव्ह असून आरटीपीसीआर कोरोना अहवाल रिपोर्ट प्रलंबित असून तो आज अपेक्षित आहे असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय पाटील यांनी सांगितले. नावाचे टिकर बदलल्याने हा प्रकार घडला असल्याचे त्यांनी सांगितले मात्र तो पहिल्यांदा दिलेला मृत्यदेह कोणाचा होता हे डॉ पाटील सांगू शकले नाहीत.

जिल्हा शासकीय रुग्णालयाने 5 मे ला पहिल्यांदा दिलेला मृतदेह कोणाचा ? मृतदेह 3 दिवस का ठेवण्यात आला ? या नातेवाईकांनी पहिल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले त्यामुळे तो मृतदेह कोणाचा होता व आता त्याचा शोध लागला तरी त्याच्या नातेवाईक यांना प्रशासन काय उत्तर देणार ? मृत्यू झाल्यानंतर शेवटचा अंत्यसंस्कार सुद्धा त्या कुटुंबाच्या नशिबी नसणार आहे.

दरम्यान मृतदेहाची ही उठाठेव कोणी व का केली ? याचा शोध घेऊन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर कारवाई करणार का हा प्रश्न विचारला जात आहे.


 
Top