उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

तालुक्यातील   टाकळी (बेंबळी) येथे एकावर गोळीबार करून पळून गेलेल्या चौघांना पुणे जिल्ह्यातील खेडशिवापूर येथे पिस्तुलसह अटक करण्यात आली. विशेष म्हणजे हे चौघेही बेंबळी व उस्मानाबाद जिल्ह्यातील पोलिसांना गुंगारा देऊन पुणे जिल्ह्यात दाखल झाले.  

पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये दीपक धनाजी जगताप (वय २६, रा. रांजे, ता. भोर), ऋषिकेश सुनिल रणपिसे (वय २२, रा. रांजे, ता. भोर), यश गणेश देवकर (वय २१, रा. रांजे, ता. भोर) आणि गणेश सुरेश शेळके (वय २१, रा. आर्वी, ता. हवेली) यांचा समावेश आहे. यापैकी जगताप मुळ टाकळी बेंबळी येथील रहिवाशी आहे.   त्यांच्याकडून १ पिस्तुल व २ काडतुसे, दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

खेडशिवापूर गावाजवळील कोंढणपूर फाटा येथे मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकी घेऊन चार संशयित थांबले असल्याची माहिती राजगड पोलीस ठाण्याचे हवालदार संतोष तोडकर यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चौघे थांबले असलेल्या ठिकाणाला घेरा टाकला.  त्यांना घेरुन पकडलण्यात आले. यानंतर त्यांची चौकशी सुरु केली. तेव्हा ते उडवाउडवीची उत्तरे देऊन पलायन करू लागले.  त्यांना पकडताना दीपक जगताप याच्या कमरेला पिस्तुल असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्याबरोबर चौघांना पोलिसांनी पकडून पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता टाकळी बेंबळी येथे  एकावर गोळीबार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. त्याची खात्री केली असता बेंबळी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असल्याचे आढळून आले. चौघांवरही आर्म अक्टअंतर्गत गुन्हा दाखल करुन राजगड पोलिसांनी अटक केली आहे.

अशी घडली होती घटना

शनिवारी सायंकाळी पाच वाजता जगताप याने टाकळी येथील एकावर गोळीबार केला. मात्र, गोळी खाली लागली. तेथे बसलेल्या दोघांना त्यातील छर्रे लागले. यामुळे ते दोघे किरकोळ जखमी झाले. तेव्हा जगताप व त्याचे तीन मित्र पळून गेले. बेंबळी पोलिस व अन्य पोलिस पथके त्यांच्या मागावर होती. मात्र, त्यांना गुंगारा देऊन ते पुणे जिल्ह्यात पोहोचले. मात्र, तेथे गेल्यावर पोलिसांना पकडण्यात यश आले.

 
Top