मुरुम/ प्रतिनिधी

येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन बेडची सुविधा तात्काळ उपलब्ध करा अन्यथा मंगळवारी (दि. ११)  पासून ग्रामीण रुग्णालयासमोर अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस व भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांना शुक्रवारी (ता.७) रोजी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 

या निवेदनात म्हटले की, ग्रामीण रुग्णालयात २५ ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध आहे, मात्र तज्ञ फिझिशिएन तसेच इतर साधन सामुग्री नसल्याने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालय प्रशासनही जबाबदारी घेण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. रुग्णालयातील राखीव १० जंबो सिलेंडरपैकी ५ सिलेंडर तुळजापूर तर २ उमरगा येथे पाठविण्यात आले आहेत. या रुग्णालयात मुरूमसह परिसरातील २० गावातील रुग्ण उपचारासाठी येतात. अशा वेळी एखादा गंभीर रुग्ण आढळल्यास त्याला पुढील उपचारार्थ उमरगा येथील उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात येते. मात्र तीथेही ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने रुग्ण वाटेतच दगावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन बेडच्या तांत्रिक बाबी दूर करून प्रशासनाने आधिक लक्ष घालून ताबडतोबीने सुविधा उपलब्ध करून दयावी, अशी मागणी दोन्ही पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे याकडे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांमधून चर्चा होत आहे. सध्या दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनाची संख्या वाढतच आहे. ऑक्सिजन बेड सुविधा अभावी रुग्णांनाचे हाल होत आहेत. यामुळे रुग्णालयातील उपलब्ध ऑक्सिजन बेड सुविधा (ता. १०) रोजी पर्यंत उपलब्ध करून रुग्णांनाची होणारी हेळसांड थांबवावी अन्यथा मंगळवारी (दि. ११)  पासून ग्रामीण रुग्णालयासमोर दोन्ही  पक्षातर्फे संयुक्त अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचे भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मिणियार, गुलाब डोंगरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन जाधव, शहराध्यक्ष बाबा कुरेशी यांनी इशारा देवून स्वाक्षऱ्यासह निवेदन दिले आहे.

 
Top