तालुक्यातील मुळज येथे एका समाजातील दोन अल्पवयीन मुलींचा विवाह २० मे रोजी होणार असल्याची माहिती मिळताच गटविकास अधिकारी, ग्रामस्तरीय समिती, ग्रामविकास अधिकारी व ग्राम कर्मचाऱ्यांनी मुलींच्या आईवडिलांसह नातेवाइकांचे समुपदेशन करून बुधवारी (दि.१९) रात्री दहा वाजता बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे.
या दोन मुलींचे वय अनुक्रमे १४ व १३ असल्याचे समजते. रात्री दहाच्या सुमारास घरी गेल्यावर घरात दोन मुली, आईवडील व नातेवाईक होते. समुपदेशन सुरू झाल्यानंतर चर्चेला सुरुवात झाली. अल्प शिक्षण झालेल्या आई-वडीलांची एकच मागणी होती की, काहीही करून विवाह करणार पण मुलीला सासरी न पाठवता घरी ठेवू अशी माहिती वडिलांनी दिली. त्यानंतर सदस्यांनी कायद्याची माहिती दिली. बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम, उल्लंघन केल्यास होणाऱ्या कारवाईची माहिती दिली. मुलगी शिकली तर घराचे दारिद्रय नष्ट होईल, मुलीला शैक्षणिक साहित्य हवे असल्यास आम्ही देतो. परंतु बालविवाह करू नका, अशी समजूत काढली. सर्वांच्या सह्यांचे लिखित स्वरूपात हमीपत्र घेण्यात आले. मुलींच्या, आई-वडीलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. दोन्ही होणारे नियोजित बालविवाह रोखण्यात ग्रामविकास प्रशासन यशस्वी ठरले, नागरिकांनी मुलांमुलींना शिकवले पाहिजे, स्वतःच्या पायावर उभे केले पाहिजे. लग्नायोग्य वय झाल्यावर लग्न करून द्यायला हवे, असे सांगितले.
मुळज गावात दोन अल्पवयीन मुलींचा गुरुवारी विवाह होत असल्याची माहिती ग्रामविकास प्रशासनाला मिळाली. त्यानंतर बुधवारी रात्री दहा वाजता मुलीच्या घरी पंसचे गटविकास अधिकारी कुलदीप कांबळे, मुळजचे ग्रामविकास अधिकारी शिवशंकर बिद्री, ग्रामस्थ आप्पाराव वडदरे, पोलिस पाटील शिवानंद स्वामी, कर्मचारी रमेश सुर्यवंशी, कृष्णा गवळी, बालाजी बिराजदार आदींनी उपस्थिती राहून आई-वडिलांचे समुपदेशन व मतपरिवर्तन करून नियोजित बाल विवाह रोखण्यात आला. आई वडिलांकडून लेखी स्वरूपात हमीपत्र घेण्यात आले.