उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कायम आहे. उस्मानाबाद जिल्हा कारागृहात आज कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळाला , जिल्हा कारागृहात तब्बल 133 कैदी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. शनिवारी 35 तर आज रविवारी 98 कैद्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलीय. त्यात 9 महिला कैद्यांचा समावेश आहे . या सर्वांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली होती. कारागृहातील एवढ्या मोठ्या प्रमाणात कैदी कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे एकच खळबळ उडालीय. कारागृहातील 272 कैद्यांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यातील 133 कैदी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. म्हणजे 49 टक्के कैद्यांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आलीय. बंदिस्त कारागृहात कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता व्यक्त केली जातेय.  

एकाच ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडल्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. या कैद्यांवर कारागृहातच उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील आणि डॉ. सचिन बोडके यांनी दिली. आज 492 नवीन रुग्ण सापडले तर 09 जणांचा कोरोनाने बळी गेलाय. 687 रुग्ण उपचारनंतर बरे झाले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे 5 हजार 687 सक्रीय रुग्ण आहेत. कोरोना रुग्णांची संख्या कमी जास्त होत असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण वाढत आहे.

 
Top