उमरगा / प्रतिनिधी- 

उमरगा तालुक्यातील थोरलीवाडी येथे बुधवारी (दि.७) सायंकाळी एका वृद्धाचा स्वतःच्या शेतातील विहीरीत मृतदेह आढळून आला. दरम्यान वृद्धाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची उमरगा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान वृद्धाच्या नातेवाईकांनी हा प्रकार घातपाताचा असल्याचा संशय व्यक्त करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिस प्रशासनाने थोरलीवाडीत दंगल नियंत्रण पथक व पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

याबाबतची प्राथमिक माहिती अशी की, थोरलीवाडी येथील तुकाराम भीमा खवडे (वय ८५)  हे बुधवारी (दि.७) शेतातून संध्याकाळी घरी परतले नसल्याने त्यांच्या नातेवाईकासह ग्रामस्थांनी शेतात शोध घेतला असता विहीरीत बुडाल्याचे दिसून आले. याची माहिती पोलिस पाटील यांनी पोलिसांना दिली. या घटनेची माहीती मिळताच पोलिस रात्रीच घटनास्थळी दाखल झाले. नातेवाईकांसोबत झालेल्या चर्चेनंतर मृतदेह गुरुवारी सकाळी काढण्याचे  ठरले. त्यानुसार सकाळी पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. दरम्यान विहिरीत दोन जनावरेही पाण्यात आढळून आली. पण सदरची जनावरे ग्रामस्थांनी सुखरुप बाहेर काढली. 

वृद्धाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला नसून मागील भांडणाच्या रोषातुन घातपात झाल्याचा आरोप मयतांच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी संबंधित लोकावर गुन्हा नोंद करण्याची मागणी करत नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला होता. गुन्हा नोंद झाल्याशिवाय मयतावर अंत्यसंस्कार न करण्याची भुमिका नातेवाईकांनी घेतल्याने उशीरापर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यात आला नव्हता. उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती अनुराधा उदमले, पोलिस निरिक्षक मुकुंद अघाव यांच्याकडून नातेवाईकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उस्मानाबाद येथून दंगल नियंत्रक पथकाच्या दोन गाड्यासह गावात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 
Top