परंडा / प्रतिनिधी :-

राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची खाती(एन.पी.एस) उघडण्या अगोदर नविन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेचा(डी.सी.पी.एस) हिशोब मिळवा या विषयाचे अनुषंगाने गणपत मोरे शिक्षण उपसंचालक लातूर विभाग लातूर यांचे कडे व्हाटसपच्या माध्यमातून निवेदन पाठवण्यात आले.

सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची‌ नविन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेची खाती राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत(एन.पी.एस) वर्ग करण्याचे आदेश शासन स्तरावरून निर्गमित झालेले आहेत.यानुसार नविन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजने अंतर्गत कपात झालेला तीन स्तर हिशोब देण्यात यावा; त्यामध्ये शिक्षकांची कपात,शासनाची कपात व त्यावरील व्याज. नविन परिभाषित अंशदान पेन्शन योजनेत झालेली कपात राष्ट्रीय पेन्शन योजनेत कशाप्रकारे वर्ग करण्यात येणार व केव्हा वर्ग केली जाणार. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ज्या पद्धतीने केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू आहेत त्याच पद्धतीने सर्व राज्य कर्मचा-यांना लागू आहे का? याबद्दल स्पष्टीकरण द्यावे जसे की कुटुंब निवृत्ती वेतन योजना व ग्रॅज्युटी याबाबत स्पष्टीकरण द्यावे.ज्या कर्मचा-यांचे कोणतीच खाते उघडलेली नाहीत त्याबद्दल धोरण स्पष्ट करावे.

वरिल सर्व शंकाचे निरसन करण्यात यावे व डी.सी.पी.एस खात्यांचा हिशोब लवकरात लवकर देणे बाबत आपल्या स्तरावरून उचित कार्यवाही अनुसरून लातूर विभागातील सर्व जिल्ह्यांचे अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी विभाग यांना अवगत करावे अशा मागण्यांचे निवेदन शिक्षण उपसंचालक लातूर विभाग लातूर यांना  सादर करण्यात आले.

सदरील निवेदनावर प्रहार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य समन्वयक दत्तात्रय पुरी, जिल्हाध्यक्ष वैजीनाथ सावंत, जिल्हा सचिव दत्तात्रय राठोड, कार्याध्यक्ष विशाल अंधारे, कोषाध्यक्ष रघुनाथ दैन, जिल्हा नेते संतूक कडमपल्ले, परंडा तालुका अध्यक्ष विनोद सुरवसे, उपाध्यक्ष शहाजी झगडे, तालुका नेते लक्ष्मण औताडे आदि.पदाधिकारी यांचे सह्या आहेत.


 
Top